सोलापूर : ‘CCTV’ च्या भरवशावर ‘ATM’!

सेंटर्सवर दिसेनात सुरक्षारक्षक; पोलिस अन्‌ बँकांना नाही गांभीर्य
ATM
ATMSakal

सोलापूर : अनेकदा एटीएम फोडून चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर प्रशासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक असताना, याकडे कानाडोळा करीत केवळ सीसीटीव्हीच्या भरवशावर करोडो रुपयांची रक्कम ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने केलेल्या शहरातील एटीएम सेंटर्सची पाहणीत समोर आला आहे.

शहरातील कोणत्याही एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे पुन्हा एकदा आवश्यक बनले आहे. खातेदारांच्या सुविधेसाठी शहरातील महत्त्वाच्या चौकांत विविध बँकांचे एटीएम सेंटर्स उपलब्ध आहेत. या एटीएम सेंटर्समध्ये अज्ञानी व वृद्ध खातेदारांची फसवणूकही होत असते. अनेकदा भरदिवसा चोरट्यांकडून एटीएम फोडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. दरोडेखोरांनी एटीएम मशिनमधील रक्कम चोरून नेली आहे. मशिन फोडता न आल्याने दरोडेखोरांनी एटीएम मशिनच उचलून नेण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे शहरातील एटीएम सेंटर्सची सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांचे वाढले काम

रात्रीच्या वेळेस आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील बॅंका आणि एटीएम सेंटर्स परिसरात दुचाकी व चारचाकीतून पहाटे चारवाजेपर्यंत पोलिसांची गस्त सुरू असते. आता नियमित गस्त घालण्याबरोबरच पोलिसांना शहरातील मुख्य चौकातील एटीएम सेंटर्सबाहेरही गस्त घालावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे महत्त्वाचे बनले आहे.

एटीएम फोडण्यात चोरटे होताहेत सराईत

पूर्वी शहरातील विविध एटीएम सेंटर्सवर कार्यरत असलेले सुरक्षारक्षक हल्ली दिसेनासे झाले आहेत. त्या ठिकाणी केवळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहेत. मात्र, चोरटे सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे तोडणे, डीव्हीआर पळविण्याचे प्रकार करत असल्याचे दिसून येते. तेव्हा इतकी मोठी रक्कम ठेवताना सीसीटीव्ही कॅमेरा इतकीच सुरक्षा एटीएम सेंटरवर पाहायला मिळत आहे.

२४ तास सुरक्षा रक्षकांची हवी नेमणूक

शहरात राष्ट्रीयकृत व काही खासगी बॅंकांचे एटीएम सेंटर्स कार्यान्वित आहेत. अगदी ग्रामीण भागात देखील एटीएमचे जाळे पसरले आहे. दोन वर्षांपूर्वी बहुतांश एटीएम सेंटर्सवर सुरक्षारक्षक दिसून येत होते. २४ तास एटीएम सेंटरजवळ सुरक्षारक्षक तैनात असायचे. मात्र मागील काही महिन्यांपासून सुरक्षारक्षक दिसेनासे झाले आहेत. २४ तास सुरक्षा रक्षकांची नेमणूक आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com