सोलापूर : साडेतीन लाख ग्राहकांना बीएसएनएलची ‘फोर-जी’ सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL

सोलापूर : साडेतीन लाख ग्राहकांना बीएसएनएलची ‘फोर-जी’ सेवा

सोलापूर : डबघाईला आलेल्या ‘बीएसएनएल’ला अचानक केंद्र शासनाच्या धोरणांमुळे १.६४ लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले. कंपनीला ऊर्जितावस्था मिळाली आहे. त्‍यामुळे शहर-जिल्ह्यात आता फोर-जी सेवा सेवा सुरू होण्यास मदत होईल आणि याचा फायदा शहर- जिल्ह्यातील साडेतीन लाख मोबाईल ग्राहकांना होणार आहे.

दिवसेंदिवस मोबाईल रिचार्ज प्लॅनमध्ये स्पर्धा वाढत आहे. मागील काही वर्षांपासून कंपनीला घरघर लागली होती. मात्र कंपनीने ग्राहक टिकून राहावेत, यासाठी नवनवे प्लॅन, ग्राहकाभिमुख योजना राबविल्या. नंतर कंपनीस उतरती कळा लागली. स्पर्धेचे आव्हान वाढत गेले. लॅंडलाइन आणि मोबाईल ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली. शहरी तसेच ग्रामीण भागात फोर-जी सेवा नसल्याने ग्राहक कमी झाले. कंपनीची ही स्थिती पाहता २८ जुलै रोजी केंद्र सरकारने १.६४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याने बीएसएनएल कंपनीसह कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. शहर आणि जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा वापरणारे ३ लाख ५२ हजार ग्राहक असून, १५ हजार २०० लॅंडलाइन ग्राहक आहेत. एफटीटीएच (फायबर टू द होम) ४ हजार ५०० कनेक्शन्स आहेत. नवीन झेडटीई तंत्रज्ञान कार्यरत आहे, म्हणून जुनाच लँडलाइन क्रमांक ग्राहकांना दिला जाईल. कंपनीकडून यापुढील काळात टीसीएस आणि सी डॉट सेवा ग्राहकांना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नवतंत्रज्ञान असलेल्या साधनांच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून बीएसएनएलची फोर-जी सेवा देणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ठळक बाबी...

बीएसएनएलमध्ये भारत ब्रॉडबँड लिमिटेड कंपनी विलीन

ग्रामीण भागात दिलेली ब्रॉडबँडची (रूरल एफटीटीएच) सेवा कंपनीच्या अखत्यारीत येणार

यामुळे कंपनीस काम करणे होणार सोपे

ग्रामीण भागात फायबरचे जाळे वाढेल आणि ज्यामुळे एफटीटीएचचा वापर देखील होऊ शकतो

शेतकरी, विद्यार्थी, सहकारी बँका आणि सरकारी कार्यालयांना अनुकूल

एफटीटीएच कनेक्टिव्हिटीचा सोपा वापर

अल्टिनेट मार्गासह होणार भविष्यात विनाअडथळा सेवा उपलब्ध

फोर-जी व भविष्यातील ‘फार्इव्ह-जी’मुळे ग्राहक वाढण्याची शक्यता

पॅकेज ठरणार ग्राहकांना लाभदायी

अत्याधुनिक उपकरणांचा वापर

टीसीएस आणि सी डॉट कंपनीच्या माध्यमातून फोर-जी सेवा देण्यात येणार असून, त्यासाठी लागणारे साहित्य हे अत्याधुनिक पद्धतीची मेड इन इंडियाची उपकरणे उपलब्ध होणार आहेत. यामुळे भविष्यात ‘फाईव्ह-जी’ सेवा देण्यासाठी अपडेट करता येणार आहे. भविष्यात ग्राहकांना या माध्यमातून फाईव्ह-जी सेवा देण्यासाठी बीएसएनएल कंपनी सज्ज असणार आहे.