
सोलापूर : गणवेशाच्या फाईलवर CEO ची स्वाक्षरी
सोलापूर: जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांच्या शाळांमधील पहिली ते आठवीतील एक लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेश देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सकाळ’च्या वृत्तानंतर शालेय शिक्षण विभागाकडेच प्रलंबित असलेल्या फाईलवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज (बुधवारी) स्वाक्षरी केली. त्यामुळे आता गणवेशाचा निधी सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.
समग्र शिक्षा अभियानाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदांना मिळालेला निधी १५ दिवसांत शाळा व्यवस्थापन समित्यांना मिळायला हवा, असे आदेश देऊनही तो निधी वर्ग झाला नव्हता. २९ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेला पात्र विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आठ कोटी ९० लाख ४३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर तो निधी शाळा व्यवस्थापन समित्यांना वर्ग होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. पण, शालेय शिक्षण विभागाकडून मंजुरीची फाईल त्यांच्याकडे उशिरा दाखल झाली.
यासंदर्भात ‘सकाळ’ने ‘गणवेश निधीच्या फाईलवर होईना स्वाक्षरी’ या मथळ्याखाली बुधवारच्या अंकात एक वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे फाईल संदर्भात विचारणा केली. त्यांनी तत्काळ फाईल आणून दिली आणि निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली. महापालिका आयुक्तांनीही त्यांच्याकडील फाईल स्वाक्षरी करून सीईओंकडे पाठवली. आता तो निधी शाळा व्यवस्थापन समित्यांना वर्ग झाला असून, गणवेशाची शिलाई आता सुरू होईल.
Web Title: Solapur Ceo Signature Uniform File
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..