सोलापूर : शहर राष्ट्रवादीत होणार मोठे फेरबदल

शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष अन्‌ युवक अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक
NCP
NCPsakal

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांमध्ये अदलाबदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष व युवक अध्यक्षाची संधी इतरांना मिळू शकते. ‘महापौर आमचाच’ हे खरे करण्यासाठी हे बदल होतील, असे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांना पक्षाने प्रदेश सचिवपदी बढती दिली. तत्पूर्वी, शहर राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षांचे वयदेखील त्या पदासाठी संपुष्टात आले आहे. दुसरीकडे, मागील सात वर्षांपासून शहराचे पद सांभाळणारे बदलून त्या ठिकाणी दुसऱ्याला संधी मिळावी, अशीही मागणी केली जात आहे. महेश कोठेंच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणूक होणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे कोठेंचा निवडीत हस्तक्षेप असणार नाही, पण इच्छुकांचे नाव अंतिम करण्यासाठी त्यांचा होकार महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेनेच्या निवडी ज्या पद्धतीने ‘मातोश्री’वरून होतात, त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील निवडी ‘राधाश्री’वरून होतील, असेही बोलले जात आहे.

त्यामुळे अनेकजण त्यांची भेट घेऊन इच्छा व्यक्त करीत असल्याचीही चर्चा आहे. पण, महापालिकेत सातत्याने उपमहापौरपद मिळवलेली राष्ट्रवादी मागील निवडणुकीत केवळ चार जागांवरच विजय मिळवू शकली. आता मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेनेच्या तुलनेत सर्वाधिक जागा मिळवून महापालिकेवर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा महापौर बसविण्यासाठी हा बदल करावाच लागेल, असाही पक्षात मतप्रवाह आहे. त्यामुळे नेमकी कोणाची उचलबांगडी होणार अन्‌ त्या ठिकाणी नव्यांना की जुन्यांनाच पुन्हा संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, जुबेर बागवान यांच्यासह आणखी काही पदाधिकाऱ्यांचे पक्षासाठी योगदान मोठे राहिले आहे. त्यामुळे त्यांनाही कुठेतरी संधी द्यावी लागणार आहे. त्यांचे पुनर्वसन कुठे होणार, याचीही उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी होण्यासाठी ‘हे’ आहेत इच्छुक

दिलीप कोल्हे, विद्या लोलगे, जुबेर बागवान, आनंद मुस्तारे, मल्लेश बडगू हे शहरातील विविध पदांवर इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातील काहीजण शहराध्यक्षपदासाठी तर काहीजण कार्याध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत. तर काहींनी शहर युवक अध्यक्ष होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलेले जात आहे. इच्छुकांमध्ये आगामी काळात आणखी वाढ होऊ शकते, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com