
सोलापुर : मोहोळ तालुक्यासाठी 19 हजार मेट्रीक टन रसायनिक खते मंजुर
मोहोळ : चालू खरीप हंगामासाठी मोहोळ तालुक्याला विविध प्रकारची 19 हजार मेट्रिक टन रासायनिक खते मंजूर झाल्याची माहिती गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे वाढता कल असल्याचे चित्र आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुका हा विविध पाणी स्त्रोतामुळे जवळजवळ संपूर्ण बागायती झाला आहे. त्यात मका ,भुईमूग, ऊस, सोयाबीन या पिकासह द्राक्ष, डाळिंब, सिताफळ या फळबागांचा ही समावेश आहे. बागायती क्षेत्र वाढल्यामुळे आपसूकच विविध प्रकारच्या रासायनिक खताला मोठी मागणी वाढली आहे. मोहोळ तालुक्यातील ठराविक भाग सोडला तर खरिपाचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र ऊस व द्राक्ष ही पिके वाढली आहेत. सध्या रासायनिक खताचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अपवाद वगळता सरासरी एक हजार ते बाराशे रुपयाच्या आत कुठल्याच रासायनिक खताचे पोते मिळत नाही. शिवाय तेही दर्जेदार असेलच याची खात्री नाही. उसा सारख्या पिकाला रासायनिक खताची मात्रा देणे म्हणजे अत्यंत खर्चिक काम आहे.
रासायनिक खताला पर्याय म्हणून अनेक शेतकरी आता गावखता कडे वळले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान चार ते पाच दूभती जनावरे आहेत. त्यांच्या माध्यमातून गावखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. गावखत एकदा पिकाला घातले की त्याचा दोन वर्ष परिणाम होतो, जमिनीत केलेले पीक चांगल्या प्रकारे येते शिवाय जमिनीचा पोत ही सुधारतो. दोन ट्रॅक्टर ट्रॉली गाव खताची किंमत साडे अकरा ते बारा हजार रुपये एवढी आहे. त्यामुळे रासायनिक खतापेक्षा शेतकऱ्यांचा कल गावखत घालण्याकडे आहे. मोहोळ तालुक्यासाठी पेरणी नुसार खतांची मागणी केली होती, तसेच किती हेक्टरवर पेरणी झाली आहे याचाही हिशोब घातला जातो. गाव खतामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळत असून त्यातून मिळणारे उत्पादन आरोग्याला चांगले असणार आहे.
असा होणार रासायनिक खताचा पुरवठा
युरिया -7 हजार 429 मेट्रिक टन
डाय अमोनिअम फॉस्फेट- 2 हजार 483 मेट्रिक टन
म्युरेटऑफ पोटॅश- 1 हजार 729 मेट्रिक टन सिंगल सुपर फास्फेट- 2 हजार 188 मेट्रिक टन
इतर सर्व खते मिळून 4 हजार 995 मेट्रिक टन
एकुण- 18 हजार 825 मेट्रीक टन
Web Title: Solapur Chemical Fertilizers Sanctioned
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..