Solapur Crime News : ऊस तोडणी साठी घेतलेल्या उचलीसाठी ऊसतोड कामगाराला केले गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur crime news sugarcane worker missing money lending crime against three police

Solapur Crime News : ऊस तोडणी साठी घेतलेल्या उचलीसाठी ऊसतोड कामगाराला केले गायब

मोहोळ : "ऊस तोडणी साठी घेतलेले पैसे परत दे" असे म्हणत एका 28 वर्षीय ऊसतोड मजूराला गेल्या 18 दिवसा पासून गायब केल्याची घटना ता 6 फेब्रुवारी रोजी घडली. या घटने बाबत तब्बल 18 दिवसांनी तिघा जणांवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन मारुती पुरी, प्रशांत मोहन पुरी, व प्रकाश विठ्ठल चव्हाण सर्वजण रा तालखेड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, भारत फुला पवार वय 28 व संगीता भारत पवार व 26 दोघे रा तालखेड (जमगातांडा) ता माजलगाव जिल्हा बीड हे पती-पत्नी कोळेगाव ता मोहोळ येथील ब्राह्मण यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम करीत होते.

6 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता ऊस तोडणीचे काम सुरू असताना, भारत पवार हा गायब झाला त्याला पळवून नेले होते. त्या बाबत मोहोळ पोलिसात मिसिंग तक्रार दाखल झाली होती.

तक्रार दाखल झाल्या नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मोहन मारुती पुरी, प्रशांत मोहन पुरी व प्रकाश विठ्ठल चव्हाण हे ऊसतोड सुरू असताना त्या ठिकाणी आले, व भारत पवार यास वाळवा जिल्हा सांगली येथील हुतात्मा साखर कारखान्याची ऊस तोडणी साठी घेतलेली उचल परत दे असे म्हणून त्यास बोलावून घेतले व गायब केले.

त्याला कोठेतरी अज्ञात स्थळी ठेवले आहे. त्यावेळी संगीता हिने आरडा ओरड केली, पण काय उपयोग झाला नाही. नंतर या तिघांच्या मोबाईल वर संगीताने संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही, तिघांचेही मोबाईल बंद होते. तेव्हा पासून भारत पवार हा अद्यापही घरी आला नाही. या घटनेची फिर्याद संगीता भारत पवार यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.