Solapur : गोव्याच्या अवैध मद्यातून जिल्ह्यात बक्कळ पैसा Solapur district liquor Goa Politics requires money resort | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor

Solapur : गोव्याच्या अवैध मद्यातून जिल्ह्यात बक्कळ पैसा

सोलापूर : राजकारणासाठी पैसा लागतोच आणि तो जमविण्यासाठी अनेकजण अवैध मार्गाचा अवलंब करतात. काही राजकीय कार्यकर्ते व पुढाऱ्यांचे हॉटेल-ढाबे आहेत. शहर-जिल्ह्यातील बहुतेक हॉटेल व ढाब्यांवर वाईनशॉपमधील दराच्या तुलनेत गोवा बनावटीची दारू निम्म्या किंमतीत मिळते. स्थानिक पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या तुलनेत गोवा बनावटीचीच दारू अधिक प्रमाणात सापडली आहे.

विशेषत्वे, जिल्ह्याच्या अर्थकारणाला गोव्याचा मद्याचा जणू काही अंशी हातभार लागत असल्याचे चित्र असून ‘खादी’वाल्यांना गोवा बनावटीचा चांगलाच ‘गोडवा’ लागला आहे. ‘उँचे लोग...उँची पसंत... त्याप्रमाणे उँचे लोग... उँची गोवा पसंत...’ असे समीकरण याबाबतीत झाले आहे.

हातावरील पोट असलेल्यांना पार्टी दिली की आपल्यालाच मतदान पडेल, असा विश्वास काहींना वाटतो. ‘इलेक्शन म्हटले की पैसा खर्च करणे’ असेच समीकरण मानले जाते. निवडणूक जेवढी मोठी-प्रतिष्ठेची तेवढाच खर्च देखील करावा लागतो. राजकीय पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांभाळावेच लागते.

त्यामुळे पैसा कमविण्याच्या हेतूने अनेकजण अवैध व्यवसाय सुरु करतात. त्यात हॉटेल, ढाब्याच्या आडून अवैधरीत्या दारू विक्री असेही प्रकार आहेत. वाइन शॉपमधील दारू खूपच महागडी असते. त्यामुळे स्वस्तात मिळणारी गोवा बनावटीची दारू चोरीच्या मार्गाने आणून विक्री करण्याचे प्रकार होतात. दरम्यान, मागील दीड वर्षांत सोलापूर जिल्ह्यात जवळपास १२०० कोटी रुपयांची दारू विक्री झाली आहे.

तर अवैधरीत्या दारू विक्री देखील मोठ्या प्रमाणावर आहे. दहा महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने साडेपाच कोटींची अवैध दारू जप्त केली आहे. त्यातील अनेक कारवाईत काही राजकीय पुढाऱ्यांनी देखील हस्तक्षेप केल्याचा अनुभव वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.

‘तो’ ३२ लाखांचा मद्यसाठा कोणाचा?

दोन दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथील एका शेतातील गोडावूनमधून तब्बल ३२ लाख १९ हजार रुपयांचा गोवा बनावट दारूचा साठा जप्त केला. शेतातील बंगल्यात ठेवलेला तो मद्यसाठा कोणाचा, याचा शोध अजूनही लागलेला नाही. दरम्यान,

सत्ताधारी शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याचे ते फार्महाऊस असल्याची चर्चा आहे. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तेथील तलाठी व ग्रामसेवकासी पत्रव्यवहार करून त्या जागेचा नेमका मालक कोण, याची माहिती मागविली आहे. सोमवारपर्यंत ते नाव समोर येणार असून त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.

गोव्याचे बनावट मद्य सोलापुरात येते कसे?

गोव्यातून अवैधरित्या महाराष्ट्रात येणाऱ्या दारूवर वॉच ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जागोजागी खबरे आहेत. तरीपण, त्यांना हुलकावणी देऊन गोव्यातील स्वस्तातील दारू चढ्या दराने विक्री करून त्यातून पैसा कमविण्याच्या हेतूने सोलापूर जिल्ह्यासह विदर्भ-मराठवाड्यात अवैधरीत्या पाठवली जाते.

कोल्हापूर-सांगली-सांगोला-पंढरपूर हा मार्ग किंवा गोवा-कर्नाटक-विजयपूरमार्गे दक्षिण सोलापूर (मंद्रूप) या मार्गाने तो साठा सोलापूर जिल्ह्यात आणला जातो. पुढे चोरीच्या मार्गाने तो मद्यसाठा नगर, नाशिक, बीड, उस्मानाबादसह इतर जिल्ह्यात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास पाठवला जातो, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ढाबे व हॉटेलवर हातभट्टीच्या तुलनेत गोवा बनावटीचीच दारू मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या विकली जाते. एप्रिल २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ या दहा महिन्यांत अवैधरीत्या विक्री होणारी जवळपास ७९ हजार लिटर दारू व ५९ हजार लिटर रसायन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त तथा नष्ट केले आहे.

- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर