जिल्ह्यातील राजकीय धुलवड; ‘पांढऱ्या खादी’च्या राजकीय प्रवासामधील रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi

सोलापूर शहर अन् जिल्ह्याच्या राजकारणाला ‘शिमगा’ तसा नवा नाही. इथलं राजकारण नेहमीच चर्चेतलं. इथं नेहमीच पेटते आरोप- प्रत्यारोपांची ‘होळी’.

Solapur News : जिल्ह्यातील राजकीय धुलवड; ‘पांढऱ्या खादी’च्या राजकीय प्रवासामधील रंग

- शिवाजी भोसले

सोलापूर - सोलापूर शहर अन् जिल्ह्याच्या राजकारणाला ‘शिमगा’ तसा नवा नाही. इथलं राजकारण नेहमीच चर्चेतलं. इथं नेहमीच पेटते आरोप- प्रत्यारोपांची ‘होळी’. टीकेच्या ‘धूलवडी’ साठी सारेच असतात इथं आसुलेले. मग याच होळी दिनी ‘पांढऱ्या खादी’ला आम्ही रंग लावतोय. सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं सध्याचं राजकारण गाण्यांमधून मिश्‍लिपणे सांगायचं असेल तर ते कसे सांगता येईल, कुठलं गाणं कुठल्या पक्षाला आणि नेत्याला सध्या सुट होईल? गाण्यांचे सूर कसे निघतील, या संदर्भातील हा खुशखुशीत स्पेशल रिपोर्ट. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय धूलवड...बुरा न मानो होली है । होळीच्या निमित्ताने, सोलापूर जिल्ह्याच्या सध्याच्या राजकीय प्रवासामधील रंग.

‘झुठा है तेरा वादा.. वादा तेरा वादा’

सोलापूर शहर-जिल्हावासियांच्या जीवावर दिल्लीच्या तख्खापर्यंत राज केलेले सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा लढविणार नसल्याचं अनेकदा सांगत असतात. हे सांगण्याची त्यांची हॅट्रीकसुध्दा होऊन झाली. लोकसभा लढणार नाही, म्हणणाऱ्या सुशीलकुमारांना लोकसभेचा ऐनवेळी मोह काही आवरत नसावा. हे तसं अनकलनीय कोडं. निवडणूक लढवायला नको म्हणणारे श्री. शिदे लोकसभेच्या आखाड्यात शड्डू हे ठोकतातच. सोलापूरकरांच्या जीवावर राज करणारे सुशीलकुमार हे सोलापूरकरांनाच प्रत्येकी वेळी खोटं सांगून त्यांचीच दिशाभूल का करतात त्यांची ही भूमिका जणू ‘झुठा है तेरा वादा..तेरा वादा’ या गाण्याप्रमाणेच.

‘हम तुम दोनो जब मिल जायेंगे, एक नया इतिहास बनाएंगे’

धर्मराज काडादींचे ‘उत्तर’ विधानसभेमधलं वादळ शमविण्यासाठी चतुर आमदार विजयकुमार देशमुख यांनी लिंगायत समाजामधील ‘वजनदार’ नेत्यांची मोट बांधणं चालू ठेवलंय. काँग्रेसचे नेते प्रकाश वाले यांच्याशी त्यांनी सलगी केली आहे. त्यासाठी त्यांनी अजमेर यात्रादेखील काढली. दरम्यान देशमुख आणि वाले ही जोडगोळी निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रीत झालीच तर ‘हम तुम दोन्हों जब मिल जायेंगे, एक नया इतिहास बनांऐ’ या गाण्याच्या ओळी त्यांना लागू पडतील. तसेच हे गाणं ते दोघेही या वळणावर गुणगुणतील.

‘अहो, दाजीबा, असं हे वागणे बरं नव्हं’

राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचं ‘मोहोळ’ अद्याप उठलेलं आहेच. तथापि, पाटील हे अद्याप स्पष्टपणानं सांगायला तयार नाहीत. मनगटावरील ‘घड्याळ’ बाजूला करुन ‘कमळ’ हातात घेण्याचा निर्णय ते कधी तालुक्यातील जनतेवर सोपवतात तर भाजप प्रवेशाचा चेंडू कधी आमदार बबनराव शिंदे या आपल्या दाजींच्या पुड्यात ठकलतात. यातून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलचा संभ्रम कायमच आहे. श्री पाटील यांच्याबाबतीमधील या संभ्रमावर आणि ‘ऊर्जा’ दिलेल्या राष्ट्रवादीशी गद्दारी करण्याच्या विचारांवर प्रतिक्रिया उमटताहेत. ‘अहो, दाजीबा असं हे वागणं बरं नव्हं. तालुक्यातील जाणकारांच्या राजन पाटील यांच्याबद्दलच्या अशाच त्या बरं का.

‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, जिंदगी भर का गम हमे इनाम दिया है’

माढा लोकसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्याच्या अत्यंत महत्वाकांक्षेमधून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यामध्ये सख्य बिघडलं आहे. उभतांमध्ये पूर्वीप्रमाणं जिव्हाळा राहिलेला नाही. ‘मै बडा..या तु बडा’ असं घमासान सुरु आहे. या प्रकरात दोघांमधील सलोख्याच्या संबंधांवर मर्यादा आल्या आहेत. ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, जिंदगी भर का गम हमे इनाम दिया है’ या गाण्याचा ओळीप्रमाणं त्यांचं एकमेकांच्या बाबतीत झालंय.

‘तुम अगर साथ देने का वादा करों, मै यूँ ही मस्त नगमें लुटाता रहूँ ’

साखर कारखानदारीमधील ‘परीस’ स्पर्श अभिजित पाटील यांना आता साखरेच्या गोडव्याबरोबरच राजकारणाचा ‘गोडवा’ वाटू लागला आहे. आमदारकीच्या सिंहासनासाठी ‘कमळ’ हुंगायचं की

‘घड्याळ’ मनगटावर बांधायचं ? याबाबतीत विचारात असलेले पाटील कमळवाल्यांना अन् घड्याळवाल्यांना जणू ग्वाही देत आहेत, तुम अगर साथ देने का वादा करों, मै यूँ ही मस्त नगमें लुटाता रहूँ. तथापि, श्री पाटील यांना साथ कोण देणार, याचे उत्तर येणाऱ्या काळाकडेच असेल.

‘हम होंगे कामयाब एक दिन, हो हो मन मे है विश्‍वास पुरा है विश्‍वास’ सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाच्या वर्तुळामधून अनेक मातब्बरांनी काँग्रेसला ‘हात’ दाखविला. दरम्यान उरलेल्या फौजेला घेऊन चेतन नरोटे काँग्रेसची पर्यायाने शिंदे परिवाराच्या नेतृत्वाची ताकद दाखवित आहेत. नरोटे यांच्या नेतृत्वामधून येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती ‘अच्छे दिन’ राहतील माहित नाही. पण काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचं सिंहासन साहेब अन् ताईंच्या आशीर्वादानं आपल्याकडे कायम राहील, असा विश्‍वास ‘हम होंगे कामयाब एक दिन, हो हो मन मे है विश्‍वास पुरा है विश्‍वास’ या गाण्याप्रमाणे नरोटे यांना वाटत असावा हेच खरं.

- दीपक साळुंखे-पाटील

‘मै वापस आऊंगा...मैं वापस आऊंगा’

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचं सिंहासन कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळावचं, असा प्रयत्न सांगोल्यांच्या दीपक साळुंखे-पाटील यांचा सातत्याने आहे. त्यासाठी पडद्यामागून ते खुप काही शिजवतात. खुप खेळ्या खेळतात. प्रसंगी बळिराम साठेंना दवाखान्यात दाखल व्हावं लागतं. त्यांना बारामती आणि मुंबईला उतारवयात येरझाऱ्या घालाव्या लागतात.त्यांची बेजारी होते. जिल्हाध्यक्षपदासाठी पवार परिवारासह मुख्यत्वे, जयंत पाटील यांच्याकडे सेटिंग असलेल्या साळुंखे-पाटलांना राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्ष पद मिळणार याचा भरोसा वाटतोय.मैं वापस आ़ऊंगा...मैं वापस आऊंगा’ हे गाणं ते गुणगुणत असतात. देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ प्रत्यक्ष सत्यात उतरलेला हा डायलॉग श्री साळुंखे-पाटील यांना नेहमी आठवत राहतो. त्यांच्य गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची वरमाला पडली तर कार्यक्रम तर दणक्यात होतील, पण यावेळचं सुत्रसंचालन लय ''देखणं’ व खुमासदार होणार बरं.

- दिलीप माने

‘यह जिंदगी कटी पतंग है’

अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या दिलीप माने यांच्याकडे सध्या कोणतचं सन्मानाचं सत्तेमधलं अन् ‘इनकमिंग’चं पदं नाही. यातून श्री माने हे राजकारणात अत्यंत अस्वस्थ आहेत. आमदारकीचं सिंहासन मिळविण्यासाठी त्यांचे जोरकस प्रयत्न आहेत. मात्र त्यांच्या राजकारणाची ''दशा आणि दिशा'' अस्थिर व भरकटलेली झाली आहे. आमदारकीसाठी त्यांचा संघर्ष अजून वाढेल हेच वास्तव असताना ‘यह जिंदगी कटी पतंग है’ या गाण्याचा अनुभव ते राजकारणाबाबतीत घेताहेत.

- उमेश पाटील

‘सरकार तुम्ही मार्केट करता जाम’

‘सरकार तुम्ही मार्केट केलंय जाम’ हे महाराष्ट्रात सर्वत्र धूमाकूळ घालत असलेले गाणं उमेश पाटील यांच्याबाबीत लागू पडतं. हायप्रोफाईल नेतृत्व उमेश पाटील यांना स्वत:चं आणि राष्ट्रवादी पक्षाचं मार्केट फार जाम करता येतं. त्यासाठी ते उभ्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. पण मोहोळ तालुक्यात लोकप्रतिनिधींनी काय केलं? यावर आगपाखड करणाऱ्या उमेश पाटील यांनाच आता ‘तुम्ही काय केलं?’ असा सवाल केला जात आहे. इतरांचं वस्त्रहरण करणाऱ्या उमेश पाटील यांचंदेखील वस्त्रहरण आता सुरु झालं आहे. ‘सरकार तुम्ही मार्केट करता जाम’ याप्रमाणं कौतुक होणाऱ्या श्री पाटील यांना स्वत:च्या भावकीपासून ‘ईट का जबाब पत्थरसे’ मिळू लागलाय.

- दिलीप सोपल, रश्मी बागल-कोलते

पावणं या गावचं का, त्या गावचं, कुण्या गावचं?

आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर बंद करुन ‘जय महाराष्ट्र’चा नारा देत हातात धनुष्यबाण घेतलेले दिलीप सोपल आणि रश्मी बागल-कोलते हे नेते सध्या कोणत्या पक्षात आहेत,याचा जावई शोध लावला जातोय.या नेतेमंडळींकडून ना शिवसेना गजर होतोय ना अन्य अप्रत्यक्ष घड्याळाचा. ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप कोणाला काही सांगू नका...कबुल ...कबुल’ या गाण्यामधील ओळींबरोबरच पावणं या गावचं का, त्या गावचं ? कुण्या गावचं ? असचं त्यांच्याबाबतीत आहे.

- प्रणिती शिंदे

बोल बच्चन... बोल... बोल... बच्चन...

काँग्रेसची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी या पक्षामधील सर्वांना एकञ आणू म्हणणाऱ्या प्रणिती शिंदे आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत. काँग्रेसच्या सर्वांना पुन्हा एकत्र आणू या त्यांच्या म्हणण्यानं पक्षाच्या सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना दिलासा वाटला होता. पण कशाचं काय? प्रणिती शिंदे आता यावर काहीच बोलायला तयार नाही. याचा अर्थ प्रणिती बोलत नाहीत, असं काढू नका बरं. हवं तर आमदार रोहित पवारांना विचारा. पहिल्याच बॉलवर त्या त्रिफळा कशा उडवतात. प्रणितींच्या बोलण्यानं रोहित यांच्या मनाच्या जखमा अजून बऱ्या झालेल्या नाहीत बरं. रोहित पवाराच्या छातीवर ‘काकां’नी बाम लावल्यामुळं म्हणे, त्यांना तात्पुता आराम मिळालाय. पण सर्व काँग्रेवाल्यांना एकत्रीत करण्याच्या भूमिकेवर प्रणिती शिंदे यांच्याबाबतीत बोल... बोल..बच्चन...बोल बच्चन हे गाणं सध्या कार्यकर्त्यांमध्ये गुणगुणलं जातयं बरं का..

टॅग्स :SolapurHolipolitical