
सोलापूर जिल्ह्यात आलेले प्रशासकीय अधिकारी सहृदयी, संवेदनशील असल्याचे त्यांनी आखलेल्या एकूणच योजनांवरून जाणवत आहेत.
‘सायकल भेट बहिणीसाठी’ उपक्रमातून मुलींसाठी शिक्षणाची कवाडं पुन्हा खुली
सोलापूर जिल्ह्यात आलेले प्रशासकीय अधिकारी सहृदयी, संवेदनशील असल्याचे त्यांनी आखलेल्या एकूणच योजनांवरून जाणवत आहेत. त्याप्रमाणे जर लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संघटना, समाजसेवी संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, दानशूर व्यक्ती, संस्थाचालकांनी संवेदनशीलता दाखविली तर मुलींचे शिक्षण सुसह्य होईल, यात शंका नाही. सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी खारीचा जरी वाटा उचलला तरी मुलींसाठी खरी निकड असलेल्या प्राथमिक गरजेच्या शिक्षणाची कवाडं खुली होतील. जिल्हा परिषदेने आखलेल्या अभिनव अशा योजनेतून लोकसहभागातून आतापर्यंत ६०० सायकली जमा झाल्या आहेत. सात हजार सायकली जमा करण्याचे उद्दिष्ट आहे.
सोलापूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा ‘ऑपरेशन परिवर्तन’ पॅटर्न देशभरात चर्चेत आला आहे. तांड्यावरील हातभट्टी गाळणाऱ्यांचे पुनर्वसन करीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत, हे विशेष! या योजनेमुळे हातभट्टी गाळण्याचे अन् कारवाईचे प्रमाण कमालीचे घटून एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
माळशिरस तालुक्यातील निमगाव हे एक मोठं खेडं. केवळ शाळेत जाण्याची सोय नसल्याच्या कारणावरून निमगावातील ४० मुलींनी शाळा सोडल्याची बाब समोर आली. तशी तर ही समाजासाठीची किरकोळ बाब. पण संबंधित मुली आणि पालकांसाठी मात्र ही गंभीर बाब बनली होती. ही गोष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना समजली, तशी त्यांनी तातडीने ‘सायकल बँक’ची योजना तयार केली. त्यातून गरजू मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकलची सोय करण्यात येत आहे. निमगावच्या एका उदाहरणावरून श्री. स्वामी यांनी ही ‘सायकल बँक’ योजना आता केवळ निमगावपुरती मर्यादित न ठेवता ती जिल्हाभर राबविली. त्यामुळे जिल्हाभरातील मुलींची खरी निकड समोर आली आणि या योजनेसाठी दात्यांनी हात पुढे करण्यास सुरवात केल्याचे सकारात्मक चित्र पाहावयास मिळू लागले आहे. श्री. स्वामी यांनी निमगावपासून सुरू केलेल्या या उपक्रमास आता रक्षाबंधनाची जोड देत ‘सायकल भेट बहिणीसाठी’ ही योजना पुढे आणली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण तसेच महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेला प्रतिसादही मिळत आहे. या योजनेत आतापर्यंत सहाशे सायकली मिळाल्या आहेत.
वाड्या-वस्त्या अन् खेड्या-पाड्यातील मुलींना शिक्षणासाठी शाळेत जाण्याची सोय नसल्याचे चित्र सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. सायकलीअभावी ज्या मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, अशांचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने सर्व्हे करण्यात आला. त्यात सोलापूर जिल्ह्यात सात हजार ८४१ मुली केवळ सायकलअभावी शिक्षणापासून वंचित राहात असल्याची बाब समोर आली. या मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी श्री. स्वामी यांनी रक्षाबंधनाचे निमित्त पुढे करत अभिनव योजना सुरू केली. बहिणीला सायकल भेट देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याची ही योजना आहे. यासाठी त्यांनी तालुका पातळीवर शिक्षक-मुख्याध्यापकांच्या सभा, भेटीगाठी सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना या योजनेत सामील होण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. संबंधितांकडून मिळालेल्या सायकली ग्रामीण भागातील सायकलपासून वंचित विद्यार्थिनींना देण्यात येणार आहेत. लोकप्रतिनिधींचा कल मतदारसंघाच्या विकासाकडे असल्याने समाजमंदिर, रस्ते, पाणी, ड्रेनेज, बस स्टॉप अशा नागरी सुविधांकडे त्यांचे लक्ष असते. परंतु, शिक्षण ही मूळ गरज असल्याने याकडे लक्ष देऊन शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, विद्यार्थिनींची गळती दूर करण्याच्या विषयात लक्ष घातले तर थेट कुटुंबाला जोडण्याचे काम होईल.
राज्यभरातील गळती होईल कमी
एका सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेवरून सात हजार ८४१ विद्यार्थिनी केवळ सायकलअभावी शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. राज्यातील अशा शिक्षणापासून वंचित मुलींचे प्रमाण तपासावे लागेल. शासनाने, शिक्षण विभागाने राज्यस्तरावर हा उपक्रम राबविला तर मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण निश्चितच कमी होईल. ही अभिनव योजना सर्वच जिल्हा परिषदांना लागू करण्याची गरज आहे.
‘सकाळ’ पॅटर्न
‘सकाळ’ने सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या) १३३ शाळांवर फोकस करत मालिका प्रकाशित केली होती. याचा सकारात्मक परिणाम होऊन ‘सीएसआर’ फंडातून या १५३ शाळांमध्ये सोलार पॅनेलसह ई-लर्निंग किट बसवून देण्यात आले. यातून प्रेरणा घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ७०० शाळांमध्ये लोकवर्गणीतून ई-लर्निंग किटबरोबरच रंगरंगोटी, बाकडे, क्रीडा साहित्यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देत शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला. ‘सकाळ’ने राबविलेला हा एक वेगळा पॅटर्न होता. तसाच सोलापूरचा सायकल पॅटर्न राज्यात जाण्याची अपेक्षा आहे.
Web Title: Solapur District Zp Scheme Girls Education Cycle Gift Motivation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..