सोलापूर : शेती, उद्योग, पाणी पुरवठ्यासाठी रात्रंदिवस वीज देणारे

फिक्स डिपॉझिटवर मिळणार ठेवींप्रमाणे व्याज
MSEDCL
MSEDCLSakal

सोलापूर : शेती, उद्योग, पाणी पुरवठ्यासाठी रात्रंदिवस वीज देणारे महावितरण थकबाकीमुळे मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेने आता प्रत्येक ग्राहकांकडून (शेती वगळून) वर्षातील बिलांच्या सरासरीतून दोन बिलांएवढी रक्कम सुरक्षा ठेव (फिक्स डिपॉझिट) म्हणून घेतली जात आहे. पण, जोवर तो ग्राहक नियमित वीजबिल भरतोय, तोवर ही रक्कम संबंधित ग्राहकाच्या नावावर तशीच राहते आणि बॅंकेतील ठेवीवरील व्याजदरांप्रमाणे त्यावर व्याजही मिळते.

राज्यात महावितरणचे पावणेतीन कोटी ग्राहक असून सोलापूर जिल्ह्यात सात लाखांहून अधिक ग्राहक आहेत. त्यात शेती ग्राहकांची संख्या मोठी असून त्यांच्याकडेच सर्वाधिक थकबाकीदेखील आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला वारंवार सवलती दिल्या जातात. सुरक्षा ठेव आकारणीत त्यांना वगळण्यात आले आहे. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक ग्राहकांना दोन बिलांची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या ग्राहकाने अडचणींमुळे दोन बिले नाही भरली, तर त्याच्या सुरक्षा ठेवीतून बिलांची रक्कम वसूल केली जाते. पण, फिक्स डिपॉझिट नसलेल्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. वाढीव वीजबिल देऊन सुरक्षा ठेव संपविली जाईल, अशी शंका काहींच्या मनात येते. पण, वाढीव वीज बिल आल्यास संबंधित ग्राहकाला ऑनलाइन व ऑफलाइन तक्रार करुन त्यात दुरुस्तीचे अधिकार आहेत. त्यामुळे सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्याच फायद्याची आहे, अशी स्थिती आहे.

सुरक्षा ठेव आकारण्याचे समीकरण

ग्राहकाचा १२ महिन्यातील वीजेचा वापर पाहिला जातो. त्याला दरमहा आलेली बिले एकत्रित करून त्याची सरासरी काढली जाते. वीज वापर कमी असल्यास कोणाला २० रुपये तर कोणाला दोन हजारांची सुरक्षा ठेव ठेवावी लागत आहे. एका ग्राहकाच्या नावे दोन कनेक्शन असतील आणि त्यातील एका कनेक्शनसाठी सुरक्षा ठेव आकारली नसल्यास त्यांचा वीज वापर खूपच कमी आहे, तो नियमित बिल भरणारा ग्राहक आहे, असे समजावे. त्या कनेक्शनची पूर्वीची काहीतरी रक्कम महावितरणकडे शिल्लक असू शकते. त्यामुळे बहुतेक ग्राहकांना एकाच कनेक्शनसाठी फिक्स डिपॉझिट आकारले गेले आहे.

सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्या फायद्याचीच आहे. शेती व इतर ग्राहकांना ते भरावी लागते. वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ही रक्कम ग्राहकाकडून घेतली जाते आणि त्यावर वर्षाकाठी व्याजही दिले जाते.

- संतोष सांगळे,अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

सुरक्षा ठेव का घेतली जातेय?

महावितरणचे अनेक ग्राहक अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देताच स्थलांतर करतात. अनेकजण स्वत:च कनेक्शन बंद करतात आणि थकीत वीजबिल भरत नाहीत. दुसरीकडे महिन्यात वापरलेल्या विजेचे बिल ग्राहकांपर्यंत वाटप होईपर्यंत साधारणत: दीड ते पावणेदोन महिन्यांचा कालावधी लागतो. तरीही, महावितरणकडून विनाखंड वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे सुरक्षा ठेव गरजेची आहे म्हणून एक महिन्याऐवजी आता दोन बिलांची रक्कम जमा करून घेतली जात आहे. १२ महिने वेळेत व नियमित वीजबिल भरणाऱ्याच्या सुरक्षा ठेवीवर बॅंकेतील व्याजदराप्रमाणे व्याजही दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com