
Solapur: कॉंग्रेस-राष्ट्रवादी युग संपून सोलापूरात भाजपचे नवे युग, विधानसभेनंतर सहकारात मजबूत
Solapur - एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील ११ पैकी ८ बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. अक्कलकोट, दुधनी, मोहोळ, अकलूज, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या बाजार समित्यांचा यात समावेश आहे. यातील पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, अक्कलकोट, दुधनी या पाच बाजार समितीवर भाजपने विजयाचा झेंडा फडकावला आहे.
तर कुर्डुवाडी, मोहोळ राष्ट्रवादी अन् सांगोला बाजार समिती शेकापच्या ताब्यात गेली. सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्रित येत सत्ता परिवर्तनासाठी वापरलेले विविध फंडे बाजार समितीत निवडणुकीत भाजपने फेल केले आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा मळा फुलविला. एकेकाळी सांगोला वगळता जिल्ह्यात सर्वत्र काँग्रेसचा बोलबाला होता. अक्कलकोटपासून ते करमाळ्यापर्यंत याच पक्षाची चलती असायची.
दरम्यान, १९७७ मध्ये जनता पक्षाची लाट, त्यानंतर समाजवादी काँग्रेसचा उदय झाला. तरीही सोलापूरची जनता काँग्रेसच्या पाठीशी कायम राहिली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि काँग्रेसमधील नाराज नेत्यांसाठी नव्या पक्षाचा पयार्य उपलब्ध झाला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात सुरू झाली.
मात्र याचा फटका काँग्रेसला बसू नये यासाठी नेत्यांनी 'तेरा भी भला, मेरा भी भला' असा राजकीय तोल सांभाळत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीमध्ये जिल्ह्याचे विभाजन करून आपले राजकारण 'सेफ' केले. २००३ पासून राष्ट्रवादीच्या झटक्याने काँग्रेसला फटका बसू लागला. अवघ्या काही वर्षातच सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीत भाजपने शहर उत्तर मतदारसंघावर कायम ताबा ठेवला होता.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये केवळ शहर उत्तर मतदारसंघ भाजपची सत्ता होती. त्यानंतर २०१४ मध्ये देशात मोदी लाट आली अन् सत्तापरिवर्तनाची वारे वाहू लागले. जिल्ह्यातील जनतेने २०१४ मध्ये भाजपचे एकाचे दोन आमदार विधानसभेत पाठविले.
त्यानंतर २०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका व अनेक ग्रामपंचायती भाजपने काबीज केल्या. तर २०१९ मध्ये शहर उत्तर, माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराला जनतेने विधानसभेत पाठविले.
बार्शीतील राजेंद्र राऊत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून भाजपचे नेतृत्व आणखी सक्षम बनले. त्यानंतर मात्र राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. या काळामध्ये विरोधकांनी भाजपला पुरते घेरले.
तरीही नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत त्या-त्या मतदारसंघातील भाजप आमदारांनी आपल्या बाजार समित्यांवर वर्चस्व कायम ठेवले. यानिमित्ताने पुन्हा एकदा आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यात भाजप यशस्वी ठरली असून विधानसभेनंतर आता बाजार समितीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रावरही भाजपची पकड मजबूत झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या वतनदारीतून राष्ट्रवादीचे कवच तयार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण झालेल्या सोलापूर जिल्ह्याला सुरुंग लावत मागील आठ वर्षात भाजप मजबूत होत असल्याचे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अन् सहकारी संस्थांच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
नुकत्याच जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत त्या-त्या तालुक्यातील भाजपच्या आमदारांनी आपल्या समित्यांवर वर्चस्व राखण्यात यश मिळविले आहे. या निमित्ताने विधानसभा, लोकसभा निवडणुकीनंतर आता सहकार क्षेत्रातही भाजप मजबूत होताना दिसत आहे.
- प्रमिला चोरगी