
Solapur : मोहोळ तालुक्यातील शेतकरी वळतोय 'पेरू' शेतीकडे
राजकुमार शहा
मोहोळ- तालुक्यातील शेतकरी आता "जुनी पीक पद्धती" बदलून इतर फळबागा सह आता "पेरू शेती" कडे वळला आहे. कमी पाणी, मजुराचा खर्च कमी व कमी कालावधीत उत्पादन यामुळे तालुक्यात वेगवेगळ्या वाणांची सुमारे चारशे एकरावर पेरूची लागवड झाली आहे.
आष्टी तलाव, आष्टी व शिरापूर उपसा सिंचन योजना, सीना व भीमा नद्या यामुळे मोहोळ तालुक्याचे सिंचन क्षेत्र वाढले. त्यामुळे ऊस हे मुख्य पीक म्हणून गणले जाऊ लागले. भीमा, जकराया, आष्टी व लोकनेते या साखर कारखान्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले.
मात्र ऊस जाताना होणारा उशीर, वेळेवर न उपलब्ध होणारे पैसे व राजकारण यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय ऊसाला देण्यात येणाऱ्या मुबलक पाण्यामुळे जमिनी क्षारपड व नापीक झाल्या आहेत हा सर्वात शेतकऱ्यांचा मोठा तोटा आहे.
या सर्व अडचणी मुळे शेतकरी फळबाग लागवडी कडे वळला आहे, त्यात "पेरू" लागवडीला शेतकऱ्यांनी ज्यादा प्राधान्य दिले आहे. पेरू ला जेवढा खर्च करावा तेवढे जादा उत्पादन निघते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे जरी हायगय झाली तरीही ते पीक पदरात पडते.
शिवाय जास्त फवारण्या ही लागत नाहीत. एक एकर उसाच्या पाण्यात सुमारे तीन एकर पेरू बाग जोपासली जाते, शिवाय मजुरांचा खर्चही कमी होतो. त्यामुळे पेरू लागवडीकडे शेतकरी वळला आहे. पेरू पाठोपाठ सिताफळ लागवड ही विस्तारतेय.
पेरूच्या रोपांची लागवड अंतरावर असल्याने झाडे मोठी होईपर्यंत आंतरपीक घेता येते. सध्या बाजारात आतुन लाल गर निघणाऱ्या पेरूला मोठी मागणी आहे. त्यामुळे कमीत कमी एकरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पादन मिळते. दरम्यान पेरू च्या आतील लाल गरा चा उपयोग जाम, जेली बरोबरच बर्फी साठी मोठ्या प्रमाणात केला जातो,
तसेच कच्चाही पेरू मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पेरू विक्री योग्य झाल्यास तातडीने हालचाल करून तो बाजार पेठेत पाठविला पाहिजे. कारण त्याची टिकवण क्षमता कमी आहे. या उलट ज्या पेरू चा आतील गर पांढरा आहे त्याला फारशी चव नाही, त्यामुळे त्याचा वापर मोठ-मोठ्या हॉटेललात
कांदा, काकडी, बीट, या पदार्थाबरोबर फोडी करून खाण्यासाठी वापरतात. पेरू दर्जेदार निघावा यासाठी त्याला "फोम" चे आच्छादन केले जाते, त्यामुळे फळाला आकर्षकपणा येतो. पेरू पासून उपपदार्थ निर्मितीची सुविधा तालुक्यात तयार झाली तर आणखी पेरूचे क्षेत्र विस्तारणार आहे.
मोहोळ तालुक्यात आतून लाल गर निघणाऱ्या पेरू ची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. उसा सारख्या पिका पेक्षा पेरूला पाणी कमीच लागत असल्याने त्याचे उत्पादन जादा येते. त्यामुळे शेतकऱ्याचा कल पेरू लागवडीकडे आहे. शिवाय उपपदार्थ निर्मिती ही करता येते.
दिनेश क्षीरसागर - शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र मोहोळ