Solapur : फायर, एनर्जी ऑडिटकडे दुर्लक्ष Solapur Fire Department Ignoring energy audit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयांचे फायर ऑडिट

Solapur : फायर, एनर्जी ऑडिटकडे दुर्लक्ष

सोलापूर : जानेवारी ते ५ मार्च २०२३ या सव्वादोन महिन्यांत अक्कलकोट रोड एमआयडीसीतील ११ उद्योगांना आग लागून कोट्यवधींचे नुकसान झाले. काहींनी महावितरणकडे बोट दाखवत व्होल्टेज कमी-अधिक होत असल्याचे सांगितले. पण, बहुतेक उद्योजकांनी त्यांच्या उद्योगांचे फायर व एनर्जी ऑडिटच केले नसल्याची धक्कादायक माहिती अग्निशामक व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत जवळपास ३०० पॉवरलूम आणि १०० हून अधिक गारमेंट उद्योग आहेत. तसेच गांधी नगर, शांती नगर, कमटम वसाहत, सुनील नगर, घोंगडे वस्ती या परिसरातही वस्त्रोद्योग पसरला आहे.

हजारो कामगारांच्या हाताला काम देणारे उद्योग आगीत भस्मसात होऊन कोट्यवधींचे नुकसान सहन करीत आहेत. त्यामुळे अनेक कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर, आता आग लागल्यानंतर त्या ठिकाणी तत्काळ अग्निशामक विभाग पोचावे म्हणून वाढीव केंद्र व दोन गाड्या उद्योजकांसाठीच दिल्या आहेत.

पण, कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या उद्योजकांनी निष्काळजीपणा न करता वेळच्यावेळी फायर व एनर्जी ऑडिट करणे जरुरी आहे. त्यात ट्रान्सफॉर्मरवरून येणारे वायरिंग, अर्थिंग व्यवस्थित आहे का, मीटर सुरक्षित आहेत का, याची पडताळणी आवश्यक आहे.

जेणेकरून आगीच्या घटना घडणार नाहीत व संभाव्य नुकसान टळेल, असा विश्वास महावितरण व अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एमआयडीसीसाठी आता नवीन ‘डीपीआर’

अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरात पॉवरलूम व गारमेंट उद्योग वाढत तथा विस्तारत आहेत. या पार्श्वभूमीवर, उद्योजकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्याकडे वाढीव विजेची मागणी नोंदवली आहे.

तसेच पूर्वीच्या ट्रान्सफॉर्मरवरून क्षमतेच्या ८० टक्के वीज वापरली जात असल्याने अनेकदा जुन्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होत आहे. ते ट्रान्सफॉर्मर बदलून देण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. भविष्यातील विजेची मागणी विचारात घेऊन महावितरण कार्यालयाने अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीसाठी नवीन कृती आराखडा (डीपीआर) तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.

अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील एका ट्रान्सफॉर्मरवर दहा-बारा व्यावसायिक ग्राहकांचे कनेक्शन आहेत. मागील दीड-दोन महिन्यांतील आगीचे नेमके कारण काय, याची पडताळणी अंत्रोळीकर नगरातील विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून केले जात आहे. जानेवारी महिन्यातील आगीसाठी ‘वीज’ हे कारण कारणीभूत नसल्याची बाब समोर आली आहे.

- आशिष मेहता, कार्यकारी अभियंता, महावितरण, सोलापूर

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील महावितरणचे सर्वच ट्रान्सफॉर्मर जुने झाले असून नियमाप्रमाणे ट्रान्स्फॉर्मरची ८० टक्के कॅपॅसिटी वापरली जात आहे. पण, सध्या १५० टक्क्यांपर्यंत लोड झाल्याने वीज वितरणाचे काम व्यवस्थित होत नसल्याने अडचणीत येत आहेत. सर्व डीपी अद्ययावत केल्यास व ट्रान्सफॉर्मर नवीन दिल्यास लोड वेरिएशन व शॉर्ट सर्किट होणार नाही.

- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स सोलापूर

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील बहुतेक उद्योगांनी फायर ऑडिट करून घेतलेले नाही. आग विझविण्यासाठी गेल्यानंतर ही बाब अनेकदा समोर आली आहे. उद्योगांना लागणाऱ्या आगीचे प्रमाण कमी व्हावे, त्यातील वित्तहानी टाळण्यासाठी आता महापालिका आयुक्तांशी चर्चा करून प्रत्येकांनी फायर ऑडिट करून घेण्याच्या दृष्टीने ठोस कार्यवाही केली जाणार आहे.

- केदार आवटे, अग्निशामक विभागप्रमुख, सोलापूर महापालिका