सोलापूर : गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी कोणाची लागणार वर्णी?

मे अखेरीस पोलिस आयुक्‍तही सेवानिवृत्त नव्या अधिकाऱ्यांचे वेध
 पोलिस
पोलिस sakal

सोलापूर: शहर गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तर दुसरीकडे पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांचीही सेवानिवृत्ती त्याच दिवशी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिस आयुक्‍त श्री. बैजल हे सेवानिवृत्तीपूर्वी गुन्हे शाखेचा प्रमुख निवडतील, की नवीन पोलिस आयुक्‍तांकडून त्यांची नेमणूक होईल, याची उत्सुकता लागली आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तथा गुन्हेगारीकडे वळलेल्या व्यक्‍तींना गुन्हे शाखेची भीती वाटते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात काम करताना गुन्हेगारी वाढणार नाही, यावर अधिक लक्ष दिले. दुसरीकडे, त्यांनी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या गुन्ह्याचा सखोल तपास करून संशयितांवर धडक कारवाई देखील केली. त्यांच्या कामाची दखल घेऊन तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी त्यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी दिली. मागील वर्षभरात त्यांनी अनेक कारवायांतून आपले कर्तृत्व सिद्ध केले.

पण, 31 मे रोजी ते पोलिस दलातून सेवानिवृत्त होत असतानाच त्यांच्यानंतर गुन्हे शाखेचा प्रमुख कोण, याची चर्चा आतापासूनच सुरू आहे. तर सोलापूर शहराचे नवीन पोलिस आयुक्‍त कोण, याचाही तर्कवितर्क लावला जात आहे. दुसरीकडे, ज्या प्रभारी अधिकाऱ्यांना सोलापूर शहरात येऊन चार-पाच वर्षे झाली, त्यापैकी काहींनी गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी काम करण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केल्याचेही बोलले जात आहे.

सहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे नव्यालाच संधी

सोलापूर शहर पोलिस दलात इतर जिल्ह्यांतून बदलून आलेल्या पोलिस निरीक्षकांपैकी बहुतेक पोलिस अधिकाऱ्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे सध्या शहरातील विविध पोलिस ठाण्यांत कार्यरत प्रभारी अधिकाऱ्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी वर्णी लागेल, अशी शक्‍यता धूसरच मानली जात आहे. तरीही, पोलिस आयुक्‍त श्री. बैजल यांच्या नजरेत कोणता अधिकारी आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुन्हेगारी वाढली, तरीही वरिष्ठांची डोळेझाकच

शहरातील सात पोलिस ठाण्यांपैकी काही पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी, अवैध धंदे तथा व्यवसायात वाढ होऊ लागली आहे. मटका, जुगारावर ‘अंकुश’च राहिलेला नाही. शहरातील गुन्हेगारी कमी होऊन सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला गुन्हे प्रकटीकरण पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा असते. पोलिस आयुक्‍तांनी त्यात आणखी ‘विशेष’ पथकाची भर टाकली आहे. पण, अवैध धंदे, गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असतानाही आणि काही अधिकारी, कर्मचारी हप्ते वसूल करतात, असे आरोप होत असतानाही वरिष्ठांनी त्या पथकात काहीच बदल केला नाही, हे विशेष. दुसरीकडे, पोलिस उपायुक्‍तांचीही खांदेपालट होणे अपेक्षित होते, पण तसेही काही झाले नाही, अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com