सोलापूर : अतिवृष्टीसाठी हेक्टरी ३० हजारांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Heavy Rain Crop Damage

सोलापूर : अतिवृष्टीसाठी हेक्टरी ३० हजारांची मदत

सोलापूर : दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे बळीराजा सातत्याने अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना पिकांची लागवड, मशागत व खते-बियाणांचा खर्च भरपाईतून परत मिळावा, यासाठी हेक्टरी १५ ते ३० हजारांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे. त्यावर पुढील मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये पडलेल्या अतिवृष्टीने २६ जिल्ह्यातील जवळपास १४ लाख ९९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास तेथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई ‘एसडीआरएफ’मधून दिली जाते. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानेही विदर्भात जाऊन अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पिकांची पाहणी केली. खरीप पेरणीनंतर काही दिवसांत अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यात फारसे नुकसान झालेले नाही.

कृषी विभागाने नुकसानीचा पंचनामा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार २६ पैकी १९ जिल्ह्यांचे अहवाल सादर झाले आहेत. उर्वरित जिल्ह्यांचे अहवाल दोन-तीन दिवसांत अपेक्षित आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षी जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी दहा हजार रुपये, बागायतीसाठी १५ हजार आणि बहुवार्षिक (फळबागा) पिकांसाठी २५ हजारांची मदत दिली होती. पण, शिंदे सरकार शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी त्या रकमेत वाढ करु शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आता नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाणार आहे.

पुढील आठवड्यात सरकारला अहवाल

जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे १४ लाख १८ हजार ३०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ऑगस्टमधील पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात ८१ हजार हेक्टरची भर पडली आहे. जिल्हास्तरावरून नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल कृषी विभाग संकलित करीत आहे. अंतिम अहवाल पुढील आठवड्यात राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानुसार बुधवारी (ता. १०) मदतीची घोषणा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ‘ओला दुष्काळ’ ही संकल्पनाच नसल्याने तसा कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असेही मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.

वाढीव मदतीचे प्रतिहेक्टरी स्वरुप

शेती प्रकार पूर्वीची मदत नवीन मदत

जिरायती १०,००० १५,०००

बागायती १५,००० २०,०००

फळबागा २५,००० ३०,०००

Web Title: Solapur Heavy Rain 30 Thousand Hectare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..