Solapur : जिल्ह्यातील आशासेविकांचा पाच महिन्यांपासून पगार नाही ; एक जुनपासून काम बंद आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur : जिल्ह्यातील आशासेविकांचा पाच महिन्यांपासून पगार नाही ; एक जुनपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

Solapur : जिल्ह्यातील आशासेविकांचा पाच महिन्यांपासून पगार नाही; एक जुनपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

Solapur - शासनाच्या आरोग्यदायी योजना शहरीभागासह ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोच करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता वर्षभर प्रयत्न करत असलेल्या आशासेविकांना उपासमारीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आशासेविकांचे मानधन मिळालेले नसल्याने, सोलापूर जिल्ह्यातील आशासेविका कमालीच्या संतापल्या असुन, तातडीने थकीत मोबदला जमा करा.

अन्यथा गटप्रवर्तिकांसह आशासेविका 'एक जुन पासून बेमुदत काम बंद आंदोलन' करणार असल्याचे निवेदन उपळाई बुद्रूक (ता.माढा) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ धनराज कदम यांना दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २७०० आशासेविका व १३६ गटप्रवर्तिका काम करत आहेत.

आशा व गटप्रवर्तिका करत असलेल्या कामामुळे आज केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक मोहिमा यशस्वी होताना दिसत आहेत. आणि या योजनांचा लाभ तळागाळातील व वाड्यावस्त्यांवरील सामान्य जनतेला होत आहे. एकीकडे आशा व गटप्रवर्तक करत असलेल्या कामाचे शासनाकडून तोंड भरून कौतुक करून त्यांचा सन्मान केला जात आहे तर, दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात आशा व गटप्रवर्तिकांना केलेल्या कामाचा वेळेवर मोबदला दिला जात नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

सद्यस्थितीत पाच महिन्यापासून राज्य व केंद्र शासनाचा मोबदला न मिळाल्याने आशा व गटप्रवर्तिकांना उसनवारी करून घरखर्च भागवावा लागत आहे. त्यामुळे त्यांची हि हालाखीची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन त्यांचा सर्व थकित मोबदला त्वरित देण्यात यावा. अन्यथा एक जून पासून जिल्ह्यातील सर्व आशासेविका व गटप्रवर्तिका बेमुदत काम बंद आंदोलन व धरणे आंदोलन करणार आहेत.

असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अशी निवेदने संपूर्ण जिल्ह्यातील ज्या त्या कार्यक्षेत्रात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दिली जात आहेत. उपळाई बुद्रूक येथे निवेदन देताना गटप्रवर्तिका शितल गाडेकर, शोभा डुचाळ, आशासेविका मीनाक्षी गुंड, रोहिणी लोंढे, सोनाली कोळी, सिंधू लोकरे, मंगल कदम, साधना शिंदे, ज्योती भोसले, मीनाक्षी गाडेकर, फरीदा काझी आदी सेविका उपस्थित होत्या.

टॅग्स :Solapuraasha workers