
Solapur: आंतरराज्यीय चोरटा जेरबंद! महापलिका कर्मचारी असल्याचा बनाव करून करायचा लूट
सोलापूर : महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवून दोघांनी दमाणी नगरातील अभिजित दिनेश सुरवसे यांच्या घरातून पावणेपाच लाख रुपयांचे दागिने चोरी केले होते. शहर गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या पथकाने यातील संशयित आरोपीचा दीड महिने शोध घेतला. शेवटी त्याला मंगळवेढ्याहून सोलापूर शहराकडे येताना जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीतील सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, १० मार्च २०२३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दमाणी नगरातील भैरव कॉलनीत राहणाऱ्या सुरवसे यांच्या घरी बांधकामाचे मोजमाप घेण्याच्या बहाण्याने दोघांनी घरात प्रवेश मिळवला.
त्यावेळी घरात फिर्यादी अभिजित सुरवसे यांचे वयोवृद्ध आई-वडील होते. त्यांना बोलण्यात गुंतवून एकाने त्यांची नजर चुकवून कपाटातील साडेचौदा तोळे दागिने व पाच हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. आयुष्यभराची कमाई चोरट्यांनी काही क्षणातच नेल्याने सुरवसे कुटुंबाची चिंता वाढली होती.
पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी या गुन्ह्यात विशेष लक्ष घालून चोरट्यांना तत्काळ शोधून काढण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व गोपनीय बातमीदारांकडून संशयितांबद्दल माहिती संकलित केली. त्यावेळी चोरटा आंध्रप्रदेशात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पण, तो मूळचा कर्नाटकातील असल्याने त्याठिकाणी पण त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर पोलिस पथकाने आंध्र प्रदेश गाठले. त्याठिकाणी पण त्याने गुंगारा दिला होता. दीड महिने त्याच्या मागावर असलेल्या पोलिस पथकाने ४ मे रोजी कृष्णा अशोका (रा. कोनांडूर, ता. शिमोगा, कर्नाटक) याला मंगळवेढा रोडने सोलापूरकडे येताना सापळा रचून जेरबंद केले.
ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई इम्रान जमादार, विनोद राजपूत, राजकुमार पवार, पोलिस हवालदार संदीप जावळे, यांच्या पथकाने यशस्वी केली. दरम्यान, त्याचा महाराष्ट्रीयन साथीदार फरार असून त्याचाही शोध सुरु आहे.
बहिणीच्या विवाहामुळे दागिने विकले नाहीत
शहर गुन्हे शाखेने जेरबंद केलेला संशयित चोरटा कृष्णा अशोका याच्या बहिणीचे २ मे रोजी लग्न आहे. त्यासाठी त्याने सोलापुरातून चोरलेले दागिने विकले नव्हते. स्वत:कडील कारने (केए ०१, एमके ६६७७) मंगळवेढ्यावरून सोलापूरकडे येताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याची झडती घेतली, त्यावेळी चोरीचे दागिने त्याच्याजवळच मिळून आले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दोरगे यांनी दिली.