Solapur : दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू- आमदार संजय शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू- आमदार संजय शिंदे

करमाळा - करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन लवकरात लवकर सुरू करणे संदर्भात मागणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंञी

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज ता.1 ऑक्टोबर 2023 रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन त्यामध्ये ता. 2 ऑक्टोबर पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात उजनी धरण 33 टक्के भरल्यानंतर खरीप आवर्तन सुरू करण्याचा प्रघात आहे, परंतु यावर्षी करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे वजा पातळीमध्ये असलेले उजनी धरण अधिक 13% असतानाच आपण वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार करून विशेष बाब म्हणून आवर्तन सुरू करण्याची आग्रही मागणी केलेली होती.

परंतु हवामान अभ्यासकांकडून येणारे अंदाज व भविष्यकाळामध्ये उजनी धरण न भरल्यास सोलापूर सह इतर तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी उजनी धरणातील पाणी आरक्षित करून पिण्यासाठी राखीव ठेवले होते.

सुदैवाने उजनी धरण लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे .काल उजनी धरण 32 टक्के असतानाच आपण या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार व चर्चा केली त्यानुसार आज 1 ऑक्टोबर रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठक होऊन दहिगाव योजनेचे आवर्तन उद्यापासून सुरू होत आहे . या आवर्तनामुळे करमाळा तालुक्यातील पूर्व भागाच्या 24 गावातील केळी बागांसह ऊस व इतर पिकांना जीवदान मिळणार आहे.

दहिगाव योजना 100% क्षमतेने कार्यान्वित करणार - श्री.एस .के .अवताडे ( उपविभागीय अधिकारी, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.12 )

आज दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टप्पा 1 व टप्पा 2 या दोन्ही पंपगृहांची पाहणी केली आहे.सर्व पंप सुस्थितीमध्ये आहेत.टप्पा 1 दहिगाव येथील 6 पंपाचे टेस्टिंग केलेले आहे तसेच टप्पा 2 कुंभेज येथीलही 4 पंप टेस्टिंग करून ठेवलेले आहेत .त्यामुळे उद्यापासून दहिगाव उपसा सिंचन योजना 100 टक्के क्षमतेने कार्यान्वित होण्यास काहीही अडचण येणार नाही. सर्वांना योग्य पद्धतीने पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.