
सोलापूर : मद्यपी १२ वाहन चालकांचे परवाने रद्द
सोलापूर : वारंवार समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या मद्यपी वाहन चालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. १२ वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यांलयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
दारूच्या नशेत वाहन चालकांवर शिस्त लावण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जाते. दारूच्या नशेत वाहन चालविल्यास हमखास अपघात होतात. त्यात अनेकदा निष्पाप व्यक्तीचा बळी जातो. अपघातामुळे संबंधितांना अनेकदा जीवघेण्या जखमा होतात. अपंगत्व येते आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास होतो. त्यामुळे दारूच्या नशेत वाहन चालवू नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून दारुड्या वाहन चालकांविरुद्ध ड्रंक अन ड्राईव्हची कारवाई केली जाते. त्यात वाहन चालकांकडून जुजबी दंडाची रक्कम वसूल केली जाते. या कारवाईला अनेक वाहन चालक जुमानत नाहीत.
कारवाई झाल्यानंतरही ते दारूच्या नशेत वाहन चालवितात. अशा वाहन चालकांची वाहतूक पोलिसांनी आता गंभीर दखल घेतली आहे. शहरात सर्व परिमंडळात कारवाईत वारंवार दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर पुराव्यासह मोटर वाहन न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. परिवहन विभागालाही वारंवार कारवाई आणि न्यायालयातून शिक्षा ठोठावूनही दारुडे वाहन चालक जुमानत नसतील तर अशा वाहन चालकांचे (ड्रायव्हिंग लायसेन्स) नेहमीसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाला कळवावी, असेही या आदेशात न्यायालयाने नमूद केले आहे.
दारूच्या नशेत वाहन चालविणे किंवा वारंवार वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बारा वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. मागील वर्षभरातातील स्थिती वाहतूक पोलिसांनी परिवहन विभागाकडे पाठविली आहे.
- विजय तिराणकर,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
Web Title: Solapur License Drunk Drivers Canceled
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..