Solapur : सोलापूर लोकसभेची जागा ‘काँग्रेस’च लढविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

Solapur : सोलापूर लोकसभेची जागा ‘काँग्रेस’च लढविणार

सोलापूर- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला असून आगामी २०२४ च्या निवडणुकीतदेखील ही जागा काँग्रेसकडूनच लढविली जाईल असे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी रात्री दैनिक ‘सकाळ’ ला सांगितले.

सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी सोडण्याबाबत उठलेले वादळ आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील हमरीतुमरी आणि चढाओढ या पार्श्वभूमीवर, ‘सकाळ’ने त्यांनी विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

राष्ट्रवादीने सोलापूर लोकसभेच्या जागेवर सांगितलेला हक्क किंवा मागणी ही अत्यंत खालच्या प्राथमिक स्तरावरची असून येथील जागेच्या बदलाबाबत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ स्तरावर अजिबात चर्चा नाही. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसच्याच ताब्यात राहणार आहे, असेही श्री शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्या या स्पष्टीकरणानंतर सोलापूर लोकसभेची जागा सोडण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जे मोठे रणकंदन माजले आहे, त्याला पूर्णविराम मिळू शकतो, असे मानले जात आहे. तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरी राष्ट्रवादी हा विषय बाजूला करणार की तसाच लाऊन धरणार? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडण्यावरुन ‘हायव्होल्टेज ड्रामा’ ठरत असलेल्या बहुचर्चित सोलापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची चाचपणी सुरु असतानाच, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जयंतराव पाटील यांच्याशी बंद दाराआड ‘चाय पे चर्चा’ केली.

चर्चेला तपशील मात्र गुलदस्त्यात राहिला असला जरी उभयतांमध्ये नेमक्या काय कानगोष्ट झाल्या? याबद्दलचे तर्क आणि अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मोठे राजकीय घमासान सुरु असतानाच, शिंदे आणि पाटील या उभयतांमध्ये बंद खोलीत चर्चा झाल्याने या प्रकरणाला वेगळे धुमारे फुटू लागले आहेत.

विशेषत्वे, सोलापूर लोकसभा मतदार संघांमधील राष्ट्रवादीवाल्यांचे वाढते दौरे हे काँग्रेसवाल्यांनी डोकेदुखी वाढणारे ठरत आहेत असेही मानले जात आहे.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पाटील यांनी नुकताच सोलापूर दौरा करत सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याबाबत वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसमध्ये खळबळ माजली. काँग्रेस राष्ट्रवादीमधील दोन नंबरच्या फळीमधील नेत्यांमध्ये वादाला चांगलेच तोंड फुटले. उभयतांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानाची ललकारी दिली.

सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला हवी असेल तरी बारामती लोकसभा आणि कर्जत जामखेड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला द्या, अशी जोरदार मागणी काँग्रेसने करीत राष्ट्रवादीवर शाब्दीक हल्ले चढविले.

त्यास राष्ट्रवादीवाल्यांनीदेखील ‘हम भी कुछ कमी नही’ हे दाखवीत जोरदार प्रत्युत्तर दिले. सोलापूर लोकसभा मतदार संघात जागा सोडण्यावरुन सध्या हायव्होल्टेज ड्रामा आणि प्रंचड घमासान, शाब्दीक युद्ध रंगले आहे.

दरम्यान याच वळणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर दौरा काढला. गुरुवारी आढावा बैठकीच्या निमित्ताने ते सोलापूर जिल्ह्यात होते. शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणच्या बैठका संपवून ते राजधानी मुंबईकडे माघारी फिरण्याच्या बेतात असतानाच, देशाचे माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी श्री पाटील यांनी आपल्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी चहाचे आवतान दिले.

जागेसाठी आग्रही न होण्याचा पाटील यांचा सल्ला

सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यावरून या पक्षाचे काही कार्यकर्ते आग्रही झाले आहेत. तथापि, जागा वाटपामध्ये सोलापूरची जागा ही काँग्रेसच्या वाट्याची आहे,

त्यामुळे या जागेसाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आग्रही होऊन आक्रमकपणा दाखवू नये, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी ‘सकाळ’ ला सांगितले.

विरोध डावलून पाटील ‘जनवात्सल्य’वर

सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘जनवात्सल्यर’वरील चहाच्या निमंत्रणासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे निघाले त्यावेळी नलिनी चंदेले, प्रशांत बाबर तसेच तौफिक शेख आदी राष्ट्रवादीमधील मंडळींनी पाटील यांना जनवात्सल्यवर श्री शिंदे यांच्या भेटीला जाण्याला विरोध केला. मात्र हा विरोध डावलून पाटील हे गुरुवारी रात्री उशिरा जनवात्सल्यवर दाखल झाले. तेथे बंद खोलीत सुशीलकुमार शिंदे यांच्यासमवेत सुमारे अर्धा तास ‘चाय पे’ चर्चा केली.

सहज चहापानाला बोलाविले होते

जयंतराव पाटील यांच्या ‘जनवात्सल्य’ भेटीच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सुशीलकुमार शिंदे यांना विचारले असता, जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असल्याची माहिती मिळाली होती, त्यावरुन त्यांना सहज चहाापानाला बोलावले.

या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा किंवा काँग्रेसला ठेवण्याचा विषय हा खुप वरिष्ठ स्तरावरचा विषय आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेची निवडणूक एकत्रीत लढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर मग कोणती जागा कोणाला सोडायची हा विषय येतो. सध्या कोणी कोणाला जागा सोडायची हा विषय नही असे शिंदे म्हणाले.

चहाचे निमंत्रण होते म्हणून गेलो

जयंतराव पाटील यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीबद्दल विचारले, ते म्हणाले, सुशीलकुमार शिंदे यांचे चहाचे निमंत्रण होते, सोलापूर दौऱ्यावर होतो, चहासाठी गेलो. त्यांच्यासोबत सहज गप्पा मारल्या. प्रकृतीची चौकशी वगैरे झाली.अर्धा तासाच्या बैठकीदरम्यमान कोणताही राजकीय चर्चा झाली नाही. सोलापूर लोकसभेची जागा सोडण्याचा विषय हा श्रेष्ठींच्या स्तरावरचा आहे. श्रेष्ठी त्याबाबत बोलतील.

प्रदेशाध्यक्षांनी केली चाचपणी

सोलापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मात्र सोलापूर जिल्ह्यातील तसेच शहरातील काही पक्षामधील काही खास अभ्यासू तसेच विश्‍वासू नेतेमंडळींकडून चाचपणी केली. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीसाठी कशी अनकुल होऊ शकते, याची माहिती जाणून घेतली.