Solapur : बैलगाडा शर्यतीसाठी लम्पीचे १०० टक्के लसीकरण आवश्यक
सोलापूर : ज्या गावांमध्ये बैलगाडा शर्यत घेण्यात येणार आहे. त्या गावातील सर्व गोवंशीय जनावरांचे १०० टक्के लम्पी लसीकरण आवश्यक आहे. शर्यतीत सहभागी होणाऱ्या सर्व बैलांच्या जोड्यांचेही लम्पी लसीकरण आवश्यक आहे. या संदर्भात शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, शासकीय पशुवैद्यकीय संस्थेचा दाखला आवश्यक असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. परवानगी देताना या अटींचे पालन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
बैलगाडा शर्यत भरविण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिता विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदींमुळे कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
जनावरांच्या बाजाराची प्रतीक्षा
सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गाय व बैलांचे आठवडे बाजार भरविले जातात. म्हैस व रेड्याचे आठवडा बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे.
लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता गाय व बैलांचे आठवडे बाजार भरविण्यास परवानगी द्यावी यासाठी जिल्ह्यात बाजार समित्यांच्यावतीने प्रशासनाकडे पाठपुरावा सु्रू आहे. हे आठवडे बाजार कधी सुरू होणार? याकडे पशुपालकांचे लक्ष लागले आहे.