Solapur : महाशिवरात्रीनिमित्त भविकांची दर्शनासाठी दाटी Solapur Mahashivratri Devotees gather darshan occasion | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddheshwar Yatra at Machanur

Solapur : महाशिवरात्रीनिमित्त भविकांची दर्शनासाठी दाटी

ब्रह्मपुरी : 'हर हर महादेव' च्या गजरात माचणुर (ता.मंगळवेढा) येथील सिद्धेश्वर यात्रा उत्सावात सुरु झाली. येथील मंदिरात शनिवार पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त पहाटे पाच वाजता आवताडे शुगर चे अध्यक्ष संजय आवताडे व सौ.सुकेशणी आवताडे तसेच नायब तहसीलदार प्रशांत पाटील ,मंडलाधिकारी धनंजय इंगोले ,ग्रामसेवक संजय शिंदे,तलाठी सचिन वाघमारे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत 'श्रीं 'ची महापूजा करण्यात आली.

यावेळी यात्रा समितीच्यावतीने आवतडे शुगर चे अध्यक्ष संजय आवताडे , नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांचा 'श्री ' ची मूर्ती श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.महाशिवरात्री निमीत्त सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे पहाटे पासून दर्शनास लांबलचक रांगा लागल्या होत्या.मंदिर परिसरात गायक मस्तान मुल्ला यांच्या भजन,कीर्तन व गौळन संगीतमय कार्यक्रमामुळे भक्तिमय आवाजाने वातावरण फुलुन गेले असून भाविकांनी गर्दी केली होती . मंदिर परिसरात महिलांसाठी व पुरुषासाठी स्वतंत्र दर्शनरांगा केल्या होत्या त्यामुळे दर्शन करणे सुलभ झाले असून भावीकांनी समाधान व्यक्त केले. भिमा नदी पात्रात पाणी असल्यामुळे भाविकांची स्नानांची सोय झाली होती.

सोलापूरपासून 40 किमी व मंगळवेढ्यापासून 14 किमी अंतरावर भीमा नदीच्या काठावर कड़ेकपारीत सुंदर असे निसर्गरम्य प्राचीन हेमाडपंथी श्री सिध्देश्वराचे मंदिर आहे.मंदिराकड़े डाव्या बाजूस भव्य असे मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे.

मंदिरामधे प्रवेश करताच समोरील भागात नंदी ,उजव्या बाजूस गणेश मूर्ति व गाभाऱ्या मधे पिंड व सिद्धेश्वराची मूर्ति आहे.मंदिरातून बाहेर येताच असून भीमा नदीच्या पात्रात सुंदर देखणे जटाशंकर मंदिर आहे .

अहिल्याबाई होळकर यांनी नदिकडे भव्य असा घाट बांधला आहे .प्राचीन काळी येथे औरंगजेब वास्तव्यास असल्याने मंदिराच्या पूर्व बाजूस भुयकोट किल्ला आहे. निसर्गरम्य असे देवस्थान असल्यामुळे येथे लाखों भाविक दर्शनासाठी सातत्याने येतात. भीमा नदीच्या पात्रात पाणी असल्यामुळे भाविकांनी पहाटे अंघोळ करून ओल्या पडद्याने दर्शन घेतले. दिवसभर मंदिर व परिसर भाविकांनी फुलून गेले होते.

मंगळवेढा आगार व सोलापूर येथून भाविकांच्या सोयीसाठी एसटी,खाजगी बसेसची सोय करण्यात आली होती. मंदिरामध्ये भावगीत, भक्तीगीत असे समुहगीत कार्यक्रम ठेवल्याने परिसर भक्तीमय बनला होता.

यामध्ये भजन सम्राट मस्तान मुल्ला, माऊली भगरे,अरुण शिवशरण, विनावादक बबन सरवळे,विठ्ठल पाटील,दत्तात्रय डोंगरे, परवेज मुलाणी आदींचा यामध्ये समावेश होता. मंदिरामध्ये भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .

भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,गोवा या राज्यतून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.त्यामुळे हा परिसर भक्तिमय वातावरणात फुलून गेला होता. भाविकांना दर्शनाचा लाभ झाला. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत यात्रा समितीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यात्रा समिती, श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशन व महिला हॉस्पिटल, मंगळवेढा यांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावर्षी यात्रेत दुकानांची संख्या जास्त असून भाविकांनी यात्रे परिसरात खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती .यात्रा समितीने योग्य नियोजन केल्याचे व कमी प्रमाणात जागा भाडे आकारले असल्यामुळे यावर्षी गर्दी मोठ्या प्रमाणात आहे तसेच विक्री चांगल्या प्रकारे होइल असे दुकानदारांनी सांगितले.

यात्रेमधे पार्किंग साठी दुचाकी व चारचाकी वाहनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी यात्रा काळात चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवेढा भाविकांना येण्याजाण्यासाठी परिवहन मंडळाच्या मंगळवेढा व सोलापूर आगाराने बसगाड़यांची सोय केली होती.

मंदिर परिसरात लाखों भाविकांचे 'श्री' चे दर्शन सुलभ होण्यासाठी महिला व पुरुषांना स्वतंत्र दर्शन रांगा असून एक पोलीस निरीक्षक , सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, पोलिस उपनिरीक्षक, स्ट्राइकिंग, होमगार्ड ,पुरुष व महिला पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.