
Solapur : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून खुनी हल्ला
बार्शी : बारावीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी खासगी शिकवणी संपवून रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरुन गावाकडे घरी जात असताना दोघांनी रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ता. ५ रोजी बार्शी हद्दीतील कासारवाडी रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ घडली. घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ता. ६ रोजी संशयितांनी पोलिसांत तक्रार का दिली म्हणून पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर कोयता व सत्तूरने वार करुन गंभीर जखमी केले.या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करुन बार्शी न्यायालयात उभे केले असता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी सात दिवस (ता. १४ पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.
अक्षय विनायक माने व नामदेव सिद्धेश्वर दळवी, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना ५ व ६ मार्च रोजी घडली. बार्शी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणी संपवून ता. ५ रोजी दुचाकीवरुन गावाकडे घरी जात होती. तेव्हा तिला रस्त्यामध्ये अडवून अक्षय माने व नामदेव दळवी या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलींने ही घटना पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. अधिक माहिती घेण्यासाठी ता. ६ रोजी पालकांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावले होते. मुलीला घरीच सोडून पालक पोलिस ठाण्यात गेले असता
ता. ६ रोजी सायंकाळी संशयित आरोपींनी पोलिसांत तक्रार का दिली म्हणत पीडितेवर कोयता व सत्तूरने डोक्यात, कपाळावर तसेच हातावर वार करुन तिची दोन बोटे तोडली. या हल्ल्यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली. बेशुद्ध अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दोघांना अटक करुन बार्शी न्यायालयात उभे केले असता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी त्यांना सात दिवसांची (ता. १४ पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनास्थळी उपअधीक्षक जालिंदर नालकूल यांनी भेट देऊन पाहणी केली