Solapur: आमदारसाहेब, काय बी करा पण आम्हाला न्याय द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 justice aasha workers

Solapur: आमदारसाहेब, काय बी करा पण आम्हाला न्याय द्या!

मरवडे - अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना २०१७ पासून मानधनामध्ये वाढ दिली नाही. सध्या महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून, त्या प्रमाणात अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मासिक उत्पन्नात वाढ झाली नाही.

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने बेमुदत संपाची घोषणा केली असून, आमदारसाहेब, काय बी करा पण आमच्या मागण्यांचा आपण शासन दरबारी आवाज उठवून आम्हाला न्याय द्या, अशा मागणीचे पत्र घेऊन मंगळवेढा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आमदार समाधान आवताडे यांची भेट घेतली.

या मागणीच्या निवेदनामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना निवृत्तीच्या वेळी मासिक मिळकतीच्या निम्मी पेन्शन मिळावी, अंगणवाडी सेविका- मदतनीस यांना सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार लाभ मिळावेत,

इंधनाचे दर वाढले असल्यामुळे पोषण आहार दरामध्ये वाढ करावी व चांगला ताजा सकस आहार द्यावा, चांगले मोबाईल देऊन त्यामधील पोषण ॲप मराठीत करावे अशा प्रमुख मागण्यांबाबतचे पत्र आमदार आवताडे यांना देऊन त्यांनी या मागण्यांना विधानसभेत पाठिंबा द्यावा, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी यावेळी केली.

शासन दरबारी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास २८ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनाला बसणार आहेत.

त्यावेळी आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून आम्हाला पाठिंबा दर्शवावा, अशी मागणीही अंगणवाडी सेविकांनी यावेळी केली. आमदार आवताडे यांनी अंगणवाडी सेविकांच्या सर्व मागण्या आपण विधानसभेत मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.

यावेळी कमल रोंगे, प्रभावती शेडबाळ, नंदा सूर्यवंशी, संध्याराणी भोरकडे, सविता देशमाने, राणी काकडे, महादेवी खांडेकर, रेश्मा राठोड, मल्लम्मा कांबळे, जयश्री इरकर, अनुसया वाघमारे, जोशीला माने, अनिता माने,

भामाबाई जाधव, उज्ज्वला सुतार, महानंदा फटे, लता सलगर, आशा काटकर, विजया गडदे, छाया गवळी, निर्मला स्वामी यांच्यासह तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका उपस्थित होत्या.

टॅग्स :SolapurMLAaasha worker