
सोलापूर : महापालिका आयुक्तांना प्रारूप प्रभागरचना तयार करण्याच्या आदेश दिले
सोलापूर : सध्या मुदत संपलेल्या व आगामी काळात मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मागील जनगणनेनुसार प्रभागाची संख्या निश्चित करावी. तसेच प्रभाग रचना निश्चित करून त्याचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू करावे, असे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. सोलापूर महापालिका आयुक्तांनाही तसे पत्र मिळाले असून आता त्यादृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार प्रभाग निश्चित केले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने यापूर्वीच मुदत संपलेल्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांकडून प्रारूप प्रभागरचना करून घेतली होती. पण, ओबीसी आरक्षणाचा तिढा न्यायालयात असल्याने राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी स्वतंत्र कायदा तयार केला. राज्यपालांच्या स्वाक्षरीने त्याची अंमलबजावणीदेखील झाली आणि सध्या मुदत संपलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त आहे. सहा महिन्यांसाठीच ही मुदतवाढ असल्याने आणि इम्पिरिकल डाटा संकलनाचे कामही आता अंतिम टप्प्यात असल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना प्रारूप प्रभागरचना तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही हाती घ्यावी, असे आदेश दिले आहेत. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी साधारणत: अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. पूर्वीच्या प्रभाग रचनेपेक्षा वेगळी प्रभाग रचना होणार नसल्यास एक महिन्यात ही कार्यवाही पूर्ण होऊ शकते. पण, प्रभाग रचनेची कार्यवाही कोणत्या निकषांनुसारकरावी, यासंदर्भात नगरविकास विभागाच्या गाईडलाईन्स येतील. त्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरु होणार आहे.
इम्पिरिकल डेटा अंतिम टप्प्यात...
शासनाच्या आदेशानुसार १९६१ ते १९९२ या काळातील ओबीसी सदस्यांची माहिती महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मागविली होती. १९९२ नंतरची माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असल्याने राज्य सरकारने तेवढ्याच कालावधीतील माहिती संकलित केली आहे. राज्य सरकारकडे ती माहिती पाठविण्यात आली असून लवकरच ती सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे.
Web Title: Solapur Municipal Commissioner Ordered Prepare Model Ward Structure
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..