सात प्रभागांच्या हरकतींची घेतली दखल

महापालिका अंतिम प्रभाग रचनेत १० टक्के बदल; मतदार यादीचे काम सुरू
महापालिकेकडून प्रसिध्द झालेली अंतिम प्रभाग रचना पाहताना इच्छूक.
महापालिकेकडून प्रसिध्द झालेली अंतिम प्रभाग रचना पाहताना इच्छूक.Sakal

सोलापूर - महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये फारसा बदल करण्यात आला नसला तरी, सात प्रभागांच्या हरकती व सूचनांची दखल घेत १० टक्क्यांची बदल राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. एकूण ३८ प्रभागांपैकी १५ प्रभागांच्या रचनेवर १०८ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यातील केवळ सात प्रभागांच्या हरकतींचा विचार करण्यात आल्याचे अंतिम प्रभाग रचनेतून स्पष्ट झाले.

महापालिकेच्या वतीने मंगळवारी (ता. १७) अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. त्यानुषंगाने १ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. १४ फेब्रुवारी २०२० अखेरपर्यंत एकूण १०८ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १०३ अर्ज हरकती व सूचनांच्या अनुषंगाने होते व उर्वरित पाच अर्ज हे सर्वसाधारण स्वरूपाचे होते. या प्राप्त १०८ अर्जांवर राज्य निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली. या सुनावणीच्या अहवालावर आधारित महापालिकेच्या वतीने आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. शहरातील ३८ प्रभागांपैकी ७ प्रभागांत आयोगाकडून थोड्याफार प्रमाणात बदल झाला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने अंतिम प्रभाग रचनेनुसार मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

दखल, अदखल हरकती

प्रभाग क्र. १०, ११, १२, १३, २१, २३, २४ च्या हरकतींची दखल घेण्यात आली. त्यानुसार दोन प्रभागांत दुभागलेल्या चाळ, वस्ती या एकत्रित केल्या आहेत. तर १, ९, १४, १८, २६, ३५, ३७, ३८ या प्रभागांच्या हरकतींची दखल घेण्यात आली नाही.

कुठे व कोणते झाले बदल?

१) प्रभाग क्र. १० मध्ये रेल्वे रुळापलीकडील निराळे वस्तीचा परिसर होता. भौगोलिक संरचनेवर प्रभाग रचना करताना डीपी रोड, रेल्वे, नद्या, नाले यांची हद्द निश्चित केली जाते. या नियमानुसार रेल्वे रुळापलीकडील निराळे वस्तीचा भाग हा प्रभाग क्र. ११ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तर प्रभाग क्र. १० मध्ये देगाव परिसर जोडण्यात आला आहे.

२) प्रभाग क्र. ११ व प्रभाग क्र. १२ मध्ये जुनी मिल चाळ विभागली गेली होती. मात्र वस्त्यांचे विभाजन न करता ही चाळ पूर्णत: प्रभाग क्र. १२ मध्ये समाविष्ट केली गेली.

३) प्रभाग क्र. १२ व २१ मध्ये कोनापुरे चाळ विभागली गेली होती. ती आता पूर्णत: प्रभाग क्र. २१ मध्ये समाविष्ट करण्यात आली.

४) प्रभाग क्र. १३ मधील डफरीन चौक ते ज्ञानप्रबोधिनी हा संपूर्ण पट्टा प्रभाग क्र. १२ ला जोडण्यात आला.

५) प्रभाग क्र. २३ व २४ मध्ये विभागलेली सलगर वस्तीदेखील एकत्रित आणण्यासाठी हा संपूर्ण परिसर प्रभाग क्र. २४ ला जोडण्यात आला.

दोन्ही आमदारांच्या हरकती अदखलपात्र

प्रभाग क्रमांक २६ साठी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांनी हरकत घेतली होती. प्रभागाचा विकास साधण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या ही प्रभाग रचना अयोग्य असल्याची सूचनादेखील त्यांनी मांडली होती. तसेच तौफिक शेख यांचा प्रभाग सर्वत्र विखुरला गेला आहे. त्यांनीदेखील प्रभाग क्रमांक ३५ वर हरकत घेतली होती. माजी गटनेते किसन जाधव यांचा प्रभागही पूरक नव्हता. मात्र आयोगाने या दोन्ही आमदारांच्या हरकतींसह इतर माजी नगरसेवकांच्या प्रभागांच्या रचनेची दखल घेतली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com