Solapur : प्रियकराच्या साथीने पत्नीनेच काढला पतीचा काटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

Solapur : प्रियकराच्या साथीने पत्नीनेच काढला पतीचा काटा

सोलापूर : डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) येथील दशरथ नागनाथ नारायणकर हा आपल्या पत्नीसोबत काही वर्षांपूर्वी सोलापुरात राहायला आला होता. त्याच्या पत्नीचे बाबासाहेब जालिंदर बाळशंकर या तरुणासोबत सात-आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पत्नी अरुणाने प्रियकर बाबासाहेब बाळशंकर याच्या मदतीने पती दशरथचा खून करण्याचा प्लॅन तयार केला. बुधवारी (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास बाबासाहेबाने अरुणाचा पती दशरथचा घरात शिरून खून केला. पत्नीनेच एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. पण, गुन्हे शाखेच्या तपास पथकाने खुनाची माहिती काढून संशयित आरोपीला काही तासांतच पकडले.

मृत दशरथ व त्याची पत्नी अरुणा आपल्या मुलीसोबत जुने विडी घरकुल परिसरातील केकडे नगरात राहात होते. सुरवातीला आर्थिक व्यवहारातून दशरथचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पण, पहाटेच्या सुमारास झालेला खून आणि पत्नीच्या जबाबावरून पोलिसांना वेगळाच संशय आला. तत्पूर्वी, पतीच्या खुनाची फिर्याद पत्नी अरुणा नारायणकर हिनेच स्वत: एमआयडीसी पोलिसांत दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट दिल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या बाजूने तपास सुरू केला.

आजूबाजूला चौकशी केल्यानंतर पोलिसांना घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी बाबासाहेब बाळशंकर हा त्या ठिकाणी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनवर कॉल केला, पण त्याचा फोन बंद होता. त्यानंतर संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. गुन्हे शाखेची तीन पथके त्याच्या शोधात होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने बाबासाहेब बाळशंकर याला मुळेगाव क्रॉस रोडवरून रात्री साडेनऊच्या सुमारास ताब्यात घेतले. प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक महेश शिंदे, कृष्णात कोळी, राजू मुदगल, कुमार शेळके, निलोफर तांबोळी, प्रकाश गायकवाड, वसीम शेख, प्रवीण शेळकंदे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. दोन्ही संशयित आरोपींना पोलिस न्यायालयात घेऊन जाणार आहेत.

Web Title: Solapur Murder Case Suspect Was Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..