सोलापूर : उत्पादक-विक्रेत्यांकडेच राष्ट्रध्वजाचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ‘हर घर तिरंगा

सोलापूर : उत्पादक-विक्रेत्यांकडेच राष्ट्रध्वजाचा तुटवडा

सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी घर, कार्यालय येथे १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. नव्या उपक्रमासाठी सोलापूरकर उत्सुक असून, पहिल्यांदाच शहरातील दुकाने व कार्यालये येथे तिरंगा फडकवायच्या तयारीत सर्वचजण तयारी करत आहेत. मात्र ध्वजाचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. नेहमीच्या तुलनेत ध्वजाच्या अतिरिक्त पुरवठ्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ७५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचा

अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रध्वजाची विक्रमी विक्री होण्याची अपेक्षा आहे. शहरातील विविध आकाराचे राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी खादी ग्रामोद्योग तसेच शहरातील दुकानांना पसंती देण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत साजरा केल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा अंतर्गत उशीरा कळविण्यात आल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने तुटवडा जाणवत आहे.

जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही झेंडे पाठविण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यामध्ये उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, सांगली, गुलबर्गा,

हैद्राबाद आदी ठिकाणी झेंडे पाठविण्यात आले आहे. दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट अशा दोन प्रसंगी खादी ग्रामोद्योग ध्वज मागवीत असतो. यावर्षी हर घर तिरंगा अभियानामुळे राष्ट्रध्वजांची विक्री वाढली आहे.

आमच्या येथून दरवर्षी दोन ते अडीच हजार राष्ट्रध्वजांची विक्री होते. यावर्षी हर घर तिरंगा अभियानाबाबत नागरिकांमध्ये असलेला उत्साह पाहता झेंड्यांची मागणी मोठी आहे. परंतु, सध्या ध्वजांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामत: मागणी असली तरी पुरवठा कितपत होणार, हा प्रश्न आहे.

- गणेश पिसे, पिसे झेंडेवाले, सोलापूर

गुजरात, उत्तर प्रदेश येथून तयार झेंड्यांची आवक होत आहे. आवक जेवढी होत आहे तेवढी विक्री होत असून, दिवसेंदिवस विक्रीमध्ये वाढ होत असल्याने झेंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. कापड कमी पडत असल्याने सध्या उत्पादन बंद आहे.

- राहुल जन्नू, विक्रेते