
करमाळा - करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्यात अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर बैठक झाली.या बैठकीत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक लागल्यापासून ही निवडणूक होणार की बिनविरोध होणार याविषयी उलट सुलट चर्चा होती.मागील पंचवार्षिक निवडणुकीत हातात तोंडाशी आलेली जगताप गटाची सत्ता सभापती शिवाजी बंडगर यांच्या बंडखोरीने गेली होती.
यावेळी झालेल्या वादाचा परिणाम तालुक्याच्या राजकारणात गेली पाच वर्षे दिसून आला .यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कशी होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप गट ,माजी आमदार नारायण पाटील गट, बागल गट या सर्व गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते .दोन दिवसापूर्वीच आमदार संजय शिंदे गटाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे आहेत.
त्यामुळे उर्वरित तीन गटांमध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. गुरुवार (ता.21) रोजी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अकलूज येथे जाऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली होती.त्यानंतर आज शुक्रवार (ता.22) रोजी सांयकाळी शिवरत्न बंगल्यावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप ,बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील ,नवनाथ झोळ,अजित तळेकर ,देवानंद बागल,कल्याण सरडे,भारत पाटील उपस्थित होते.या बैठकीत माजी आमदार नारायण पाटील गटासाठी दोन व बागल गटासाठी दोन या ग्रामपंचायत मतदार संघातील जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित सोसायटी मतदार संघातील 11 जागा माजी आमदार जयवंतराव जगताप गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच व्यापारी मतदारसंघातील दोन जागा जगताप गटाच्या बिनविरोध निवडून आले आहेत तर हमाल पंचायत गटातील जागेवरती सावंत गटाचा उमेदवार बिनविरोध झाला आहे.