
Solapur : लागवड ते निर्यातीच्या सेवेचा नावीन्यपूर्ण प्रयोग
सोलापूर : सोलापूरच्या डाळिंबाला ‘जीआय’ मानांकन मिळाल्यानंतर डाळिंब उत्पादकांना लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत एकहाती सल्ला सेवेच्या माध्यमातून पंढरपूरच्या प्रशांत डोंगरे यांनी नवा प्रयोग केला आहे.
प्रशांत डोंगरे यांनी सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्र व लोकमंगल संस्थेत शिक्षण घेतले. सोलापूरच्या डाळिंबाला जीआय मानांकन मिळाल्यानंतर पुढील काळात डाळिंब निर्यातीचे वेध उत्पादकांना लागले. पण त्यासोबत उत्पादकांसमोर निमॅटोड, मर, तेल्या या आजाराचे आव्हान समोर होते.
प्रशांत डोंगरे यांनी सुरवातीला जैविक व सेंद्रिय खताची विक्री केंद्र सुरु केले. मात्र त्यावेळी शेतकऱ्यांचा सेंद्रिय खतावर कमी विश्वास होता. पण शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च कमी करून उत्पादन तेवढेच व्हायला हवे, म्हणून प्रशांत डोंगरे यांनी शेतावर जाऊन सल्ला सेवा देण्यास सुरवात केली. त्यासोबत सेंद्रिय व रासायनिक खत वापराचे प्रमाण ६०:४० व ५०:५० असे आणून शेतकऱ्यांचा खर्च कमी करुन दिला.
लागवडीपासून वापरलेल्या जैविक खताचा परिणाम डाळिंबावरील रोग कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी लागवडीपासूनची सेवा सुरु केली. ते स्वतः डाळिंब उत्पादक असल्याने त्यांनी लागवडीचा स्वतःचा अनुभव देखील वापरात आणला. लागवडीनंतर बहाराचे नियोजन व नंतर माल विक्री पर्यंत त्यांनी शेतकऱ्याला सेवा दिली.
तसेच निर्यातीसाठी देखील आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करुन ते देतात. निर्यातीसाठी रेसीड्यूफ्री डाळिंबे करायची तर ती कशी करावीत, याचे मार्गदर्शन ते देतात. त्यातून त्यांनी ७० उत्पादकांना निर्यातदार बनवले. त्यासोबत ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी रासायनिक खताचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी मदत सुरु केली. एकरी १२१ टन उत्पादनाचा उच्चांक त्यांनी उत्पादक शेतकऱ्यांकडून करुन घेतला. शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढविण्याचे पूर्ण नियोजन ते करुन देतात.
या सेवेतून डाळिंब, ऊस व आंबा उत्पादकांना लागवडीपासून रोगांचे संरक्षण, काढणी पश्चात विक्री व निर्यातीपर्यंत सेवा देण्याचे काम होऊ लागले.
काही ठळक नोंदी
- ७० शेतकरी बनले डाळिंब निर्यातदार
- बाजारात डाळिंबाला वाढीव भाव मिळवून देण्याचा प्रयत्न
- ऊस उत्पादकांचे कमी खर्च व अधिक उत्पादनाची सेवा
- केसर आंब्याचे बहार नियोजनाची सेवा
- ८ जणांना अप्रत्यक्ष रोजगार
अवकाळी नुकसान टाळण्याचे प्रयत्न
हवामानाचा अंदाज आल्यानंतर त्यापूर्वी प्रशांत डोंगरे यांनी डाळिंब उत्पादकांना कळीची गळ टाळण्यासाठी योग्य सल्ला दिल्यानंतर कळीची गळीपासूनचे नुकसान कमी करण्यात शेतकऱ्यांना यश आले. या प्रमाणे अवकाळीच्या अंदाजावरून देखील नुकसान टाळणे शक्य होऊ लागले आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य सल्ला सेवेची जोड दिली तर त्याचे उत्पादन वाढू शकते. मी स्वतः शेतकरी असल्याने इतर शेतकऱ्यांच्या लागवड ते बाजारपेठेत योग्य भाव मिळवून देईपर्यंतच्या प्रवासात सहभागी होऊन काम करता येते.
-प्रशांत डोंगरे, पंढरपूर