
सोलापूर : पहिल्याच दिवशी पालकांनी ठोकले शाळेस कुलूप
करकंब : करकंब येथील पांढरेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर तीन शिक्षक पात्र असताना केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही शिक्षक न दिल्याने संतप्त झालेल्या येथील पालकांनी आज (ता. १५) शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेस कुलूप ठोकले.
शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग असून पट ७६ आहे. येथे नियमानुसार तीन शिक्षक कार्यरत होते. मात्र बदली प्रक्रियेमध्ये अन्याय झाल्याने दोन शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयीन आदेशाने त्यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे तेथे एकच शिक्षक कार्यरत राहिला. मात्र त्यानंतर अद्याप बदली प्रक्रिया राबविली गेली नसल्याने दुसरा शिक्षक या शाळेवर येऊ शकला नाही. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी वेळोवेळी प्रशासनास भेटून शिक्षकाची मागणी करूनही त्याची पूर्तता होऊ शकली नाही.
त्यामुळे शाळेचा कार्यभार सांभाळून पाच वर्गांची जबाबदारी एकाच शिक्षकावर येऊन पडली. परिणामी प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेस कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. दरम्यान केंद्रप्रमुख द. श. मोरे यांनी शाळेस भेट देऊन एक-दोन दिवसात एखादा शिक्षक उपलब्ध करून देऊ, अशी भूमिका घेऊन पालकांना कुलूप उघडण्याची विनंती केली. मात्र पालकांनी जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत कुलूप न उघडण्याची भूमिका घेतली.
सरपंचांच्या वस्तीवरील शाळा बंद
विशेष म्हणजे पांढरेवस्ती शाळा ही करकंबच्या सरपंच तेजमाला पांढरे ह्या राहत असलेल्या वस्तीवरील शाळा आहे. त्यांनीही या शाळेत शिक्षक उपलब्ध व्हावेत, यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन पाठपुरावा केला. मात्र त्यांना यश आले नाही. सर्वत्र सरपंचांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरे होत असताना पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावच्या सरपंचाच्या वस्तीवरील शाळा मात्र पालकांनी बंद ठेवली होती.
आमच्या शाळेवर तीन शिक्षक पात्र असताना मागील चार-पाच महिन्यांपासून एकच शिक्षक कार्यरत आहे. याबाबत आम्ही प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष केले गेले. आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नियमानुसार लवकरात लवकर आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्यावे, एवढीच आमची मागणी आहे.
- मल्हारी मदने,अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
Web Title: Solapur Parents Hit School Lock
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..