
Solapur : बलात्काराच्या केसमध्ये हलगर्जीपणा, ‘एपीआय’,‘पीएसआय’सह दोन हवालदार निलंबित
सोलापूर/बार्शी : अल्पवयीन अत्याचार पीडितेची तक्रार दाखल करून घ्यायला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवून बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व एका हवालदारासह बार्शी शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकासह एका हवालदारास महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशाने पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निलंबित केले.
तालुक्यातील एका गावामधील बारावी परीक्षार्थी अल्पवयीन मुलगी घरी जात असताना ता. ५ रोजी तिच्यावर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी अत्याचार केला. पीडितेने त्याच दिवशी पोलिसात फिर्याद दाखल करूनही तपास अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन संशयितांना अटक केली नाही. तसेच वैद्यकीय तपासणीदेखील केली नाही.
संशयित आरोपींना ताब्यात घेतले असते तर दुसरा गुन्हा टळला असता. पोलिसांच्या विलंबामुळे संशयितांनी तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पीडितेच्या गावातील घरात घुसून दुसऱ्या दिवशी (ता. ६) तिच्यावर सत्तूर व कोयत्याने वार केले. या घटनेनंतरही पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले. त्यानुसार बुधवारी (ता. ८) शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे व पोलिस हवालदार राजेंद्र मंगरूळे या दोघांसह बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका गुटकूल व पोलिस हवालदार भगवान माळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या घटनेने पोलिस दलात प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान, ता. ६ रोजी बार्शी शहर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक म्हणून संतोष गिरीगोसावी रुजू झाले असून त्यांच्याशी संपर्क साधला असता संबंधितांना निलंबित केल्याचे आदेश प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला दिन नाही झाला साजरा
दरवर्षी महिला दिनानिमित्त पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदारपासून मदतनीसांपर्यंत सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सायंकाळी सत्कार केला जातो. पण यावर्षी उपनिरीक्षक सारिका गटकूल यांचे निलंबित झाल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.
विभागीय चौकशी
पोलिसांनी संशयित आरोपींना तत्काळ अटक का केली नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतरही पीडिता दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिला संरक्षण का मिळू शकले नाही, यासंदर्भात आता निलंबित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.