
ऑगस्टमध्ये सोलापुरात ’एसपीएल’! क्रिकेट असोसिएशनकडून पार्क स्टेडिअमची पाहणी
सोलापूर : स्मार्ट सिटीतून २० कोटींचा खर्च करून इंदिरा गाधी पार्क स्टेडिअम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात आले आहे. मैदान व सामन्यांच्या खेळपट्टींचा अंदाज यावा म्हणून पहिल्यांदा या मैदानावर महापौर चषक तथा सोलापूर प्रिमियर लिग (एसपीएल) खेळविले जाणार आहे. त्यासाठी निवड समितीने आठ संघांच्या खेळाडूंची निवड केली असून यंदा तीन महिला संघ असणार आहेत. सामन्यांची सुरवात जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून करण्याचे नियोजन जिल्हा क्रिकेट असोसिएशनने केले आहे.
महापौर चषकाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट असोसिएशनला मैदानावर लावायची साईड स्क्रिन, बॉन्ड्री लाईन रोप असे साहित्य मिळाले आहे. या चषकासाठी महापालिकेकडून आठ लाख रुपये दिले जाणार आहेत. प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला प्रत्येकी १५ हजार रुपये मिळणार आहेत. दोन लाख रूपये रोख व चषक असे प्रथम क्रमांकाचे बक्षिस असेल. तर दुसऱ्या क्रमाकांला एक लाख रुपयांसह चषक मिळणार आहे. प्रत्येक संघाला १४ खेळाडू लिलाव पध्दतीने दिले जाणार आहेत. आता पाऊस उघडल्याने जिल्हा क्रिकेट असोसिएशन, निवड समिती, मैदान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (रविवारी) मैदानाची पाहणी केली. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबुर्स, मैदान समितीचे सदस्य दिलीप आवाड, निवड समितीचे सदस्य शिवा अकलूजकर, राजेंद्र गोटे, संतोष बडवे, संजय बडवे व प्रकाश भूतडा आदी उपस्थित होते. दरम्यान, मैदान विकसीत केल्यानंतर पहिल्यांदाच त्या मैदानावर मोठे सामने खेळविले जाणार आहेत. सामन्यांसाठी मैदानावर ११ तर खेळाडूंना सरावासाठी आठ पिचेस (खेळपट्ट्या) तयार करण्यात आल्या आहेत. महापालिकेवर सध्या प्रशासक असल्याने या चषकाचे उद्घाटन नुतन पालकमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील व्हावेत पालकमंत्री
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कबड्डी, कुस्ती, क्रिकेट या खेळांविषयी भरपूर माहिती आहे. राजकारणात त्यांचे मोठे वलय आहे. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिल्यास निश्चितपणे जिल्ह्यातील युवा खेळाडू राज्य व देशपातळीवर चमकतील, असा विश्वास क्रिकेट असोसिएशनला आहे. नूतन पालकमंत्र्यांच्या हस्ते महापौर चषकाचे (एसपीएल) उद्घाटन करण्याचे नियोजन जिल्हा क्रिकेट असोसिएशनने केले आहे.
Web Title: Solapur Premier League At Indira Gandhi Park Stadium In August Inspection Of Stadium By Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..