
सोलापूर शहरात मागील काही महिन्यात येथील बेघर निवारा केंद्रातील तब्बल ३२५ जणांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.
Solapur News : बेघर निवारा केंद्रात स्वावलंबन, ध्यान अन् प्रार्थनेचे घुमताहेत सूर
सोलापूर - शहरात मागील काही महिन्यात येथील बेघर निवारा केंद्रातील तब्बल ३२५ जणांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यासोबत ध्यान व प्रार्थनेचा सराव देखील बेघराचे मनोबल वाढवणारा ठरला आहे.
भिक्षेकऱ्यांच्या तुलनेत बेघरांची संख्या घटली आहे. महानगरपालिकेच्या ७५व्यक्तींची क्षमता असलेल्या बेघर निवारा केंद्रात केवळ १५ बेघरांनी आश्रय घेतला आहे. कोरोनानंतर हा आकडा अगदीच कमी होत चालला आहे.
महानगरपालिकेकडून सातत्याने शहरात बेघर व भिक्षेकऱ्यांची पाहणी सुरु असते. कोरोना व त्यानंतरच्या काळात बेघरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. त्यानंतर मात्र ही संख्या हळूहळू घटत गेली. केवळ कर्नाटक, तेलंगण भागातून आलेल्या अनाहूत बेघरांचे प्रमाण त्यामध्ये जास्त होते. त्यानंतर या बेघर निवारा केंद्रात बेघरांची संख्या घटत चालली आहे.
मात्र काही कालावधीत बेघरांचे स्वावलंबनाचे प्रमाण वाढले आहे. या शिवाय एसएसवाय (सिद्ध समाधी योग)च्या मदतीने नियमित प्रार्थना व ध्यानाने केंद्रातील वातावरणात मोठाच बदल झाला आहे.
भिक्षेकऱ्यांची संख्या कायम
बेघरांच्या शोधात आता शहरातील समाजसेवी संस्था देखील हातभार लावत आहेत. मागील काही दिवसापासून शहरात बेघरांच्या बाबतीत होणारी सर्वेक्षणे पाहता त्यामध्ये भिक्षेकऱ्यांची संख्या कायम राहिली आहे. पाहणीत हे भिक्षेकरी बेघर निवारा केंद्रात येण्यास तयार होत नाहीत. त्यांना पुरेसे अन्न मिळते व आर्थिक उत्पन्न घेऊन ते घरी राहण्यास जातात. सकाळी पुन्हा भिक्षा मागण्याच्या स्थानी जमा होतात.
- शहरात भिक्षेकऱ्यांची संख्या कायम
- बेघरांची संख्या घटली
- मनोरुग्णांची संख्या मर्यादित
- भिक्षेकऱ्यांकडून गरजेपेक्षा अधिक मिळालेल्या जादा अन्नाची नासाडी
आकडे बोलतात
- शहरातील एकूण भिक्षेकरी - अंदाजे १०० ते १५०
- बेघर निवारा केंद्रातील बेघरांची संख्या - १५
- शहरातील मनोरुग्णांची संख्या- अंदाजे ८-१०
- एकूण पुनर्वसन झालेल्या बेघरांची संख्या- ३२५
वेदनादायी अनुभव
सध्या बेघर निवारा केंद्रात एक पुण्याचे ८३ वर्षाचे व्यक्ती आहेत. त्यांचा मुलगा व नातू यांचे चिंचवडमध्ये फ्लॅट व इतर स्थावर मालमत्ता आहेत. या व्यक्तींनी मोलमजुरी करून मुलाला मोठे केले. पण आता मुलास संपर्क केल्यास मुलगा आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काही केले नाही असे सांगून स्वीकारण्यास तयार होत नाहीत. सत्तरफूट भागातील एक अविवाहित वृद्धा बेघर निवारा केंद्रात राहत होती. तिचे भाऊ व भावजय सत्तर फूट भागात राहतात. या वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे भाऊ व भावजय पाहण्यास देखील आले नाहीत.
बेघर निवारा केंद्रात सध्या १५ जण राहत आहेत. प्रत्येक बेघरांवाल्यांची आधी उपचाराची गरज भागवली गेली. नंतर समुपदेशनाच्या मदतीने अनेक बेघर स्वतःचा रोजगार मिळविण्यास सक्षम झाले आहेत.
- अशोक वाघमारे, व्यवस्थापक, बेघर निवारा केंद्र, कुमठे नाका.