
Solapur : श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा; उकाड्यातसुद्धा भक्त दर्शनासाठी आतुर
अक्कलकोट : श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४५व्या पुण्यतिथीनिमित्त लाखापेक्षा जास्त भाविक स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. स्वामीनामाचा जयघोष करीत हजारो भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या.
श्री स्वामी समर्थांचा १४५वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. ‘अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ या आबालवृद्धांच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमला. पहाटे दोनपासूनच ‘श्रीं’च्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती.
सर्व स्वामीभक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसरात बॅरिकेडिंग टाकून चांगली सोय केली होती. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता राजे फत्तेसिंह चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला एका बाजूने कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती.
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोळप्पा महाराजांचे वंशज पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते पहाटे दोन वाजता पारंपरिक पद्धतीने ‘श्रीं’ची काकडआरती झाली.