Solapur Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेच करतील सोलापूरचे नेतृत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SushilKumar Shinde

Solapur Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेच करतील सोलापूरचे नेतृत्व

सोलापूर - सोलापूकरांनी दोनवेळा भाजपला खासदारकीची संधी दिली आणि सोलापूर जिल्हा ५० वर्षे पिछाडीवर गेला. जिल्ह्याच्या विकासाची कास असलेल्या नेत्याला तुम्ही पराभूत केले. पण, आता तुम्ही त्यांचा अपमान करणार नसाल तर पुन्हा त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आदींनी दिली. यावेळी पटोले म्हणाले, नुसते सोलापूरच नव्हे तर माढ्याचाही खासदार आपलाच करायचा आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

शहर काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता. २१) हुतात्मा स्मृती मंदिर येथे निर्धार मेळावा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, नसिम खान, आमदार भाई जगताप, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार रामहरी रूपनवर, विश्वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे,

महिला जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबुटे, संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, महेश लोंढे, मनीष गडदे, तिरूपती परकीपंडला, भिमाशंकर टेकाळे, वाहिद विजापुरे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी प्रास्ताविक करताना चेतन नरोटे यांनी सुशीलकुमार शिंदे हेच सोलापूरचे नेतृत्व करतील आणि सत्ता आल्यानंतर आम्हाला प्रणिती शिंदेंच्या रूपाने झुकते माप द्या, अशी मागणी केली. तर समोरील काहींनी सुशीलकुमार शिंदेंच आमचे नेते असल्याची घोषणाबाजी केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्षांनी त्याची पूर्तता होईल, असे आश्वासन दिले.

अशोक चौकात ५०० मुला-मुलींचे अभ्यासिका केंद्र

सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरातील पोलिस मुख्यालयाजवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून दोन मजली इमारत साकारण्यात आली आहे. त्याठिकाणी ५०० मुला-मुलींना ‘एमपीएससी’ व ’युपीएससी’चा अभ्यास करता येणार आहे. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण रविवारी पार पडले.

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची पुस्तके, तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्याठिकाणी मिळणार आहे. तसेच शुभराय आर्ट गॅलरीच्या कामाचे भूमीपूजन देखील पार पडले. सर्वसामान्या आणि गोर गरीब परिवारामधील मुलांना अभ्यासासाठी पुरक अन्‌ अनकुल वातावरण नाही, त्यामुळे या मुलांची अडचण आहे. हे ओळखून अभ्यास केंद्र उभारण्यात आले आहे.

टॅग्स :BjpShiv SenaNCPelection