PM Sukanya Samriddhi Yojana : ‘पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजने’त सोलापूरची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur top in Prime Minister Sukanya Samriddhi Yojana 3 thousand 419 accounts opened

PM Sukanya Samriddhi Yojana : ‘पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजने’त सोलापूरची बाजी

सोलापूर : येथील टपाल विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेच्या अभियानात देशपातळीवर महाराष्ट्र टॉपर राहिला आहे. अत्यंत कमी रकमेच्या बचतीवर मुलीच्या शिक्षण व विवाहासाठी मोठी रक्कम देणाऱ्या या योजनेकडे आता पालकांचा ओढा वाढला आहे.

बचतीच्या रकमेवर सर्वाधिक व्याज देणारी ही योजना आहे.या योजनेत देशात महाराष्ट्र टॉपर ठरतानाच, या योजनेची सोलापूर जिल्ह्यात यशस्वी घौडदौड सुरु असून जिल्ह्यात आजवर ३ हजार ४१९ खाती उघडली आहेत. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत बार्शीची सरशी झाली आहे.

जिल्ह्यातील सर्वच टपाल कार्यालयाकडून या योजनेसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हे विशेष अभियान राबविले गेले. मुलींच्या पालकांपर्यंत योजनेची माहिती देण्यासाठी जनजागर करण्यात आला. केवळ मुलींच्या लाभासाठी असलेली ही योजना इतर आर्थिक गुंतवणुकीच्या तुलनेत सर्वाधिक फायद्याची ठरते आहे.

मुलींचे शिक्षण व लग्न या दोन मोठ्या खर्चाचा विचार एकाच योजनेत असल्याने पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक समजली जाते. एकाच गुंतवणुकीत दोन लाभामुळे मुलींचे आरोग्य वगळता इतर खर्चासाठी वेगळी गुंतवणूक करण्याची गरज होत नाही. मुलगी ही दुसऱ्या घरी विवाहानंतर जाते म्हणून तिच्या शिक्षणाबद्दलची उदासीनता कमी होण्यास या योजनेने मदत केली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

  • केवळ २५० रुपयाच्या मासिक बचतीपासून सुरवात

  • दोन मुलीकरता खाते उघडता येणे शक्य

  • मुलीचे लग्न झाल्यास मुदतपूर्व खाते बंद करता येते

  • मुलीच्या शिक्षणासाठी पन्नास टक्के रक्कम खर्च करणे शक्य

  • सध्याचा योजनेवरील व्याजदर ७.६ टक्के

  • चक्रवाढ व्याजामुळे परिपक्वता राशीचा लाभ अधिक

  • खाते उघडल्यापासून कमीत कमी १५ वर्षे भरणा

मुद्दलपेक्षा व्याज दुपटीपर्यंत

  • एकूण १५ वर्षातील भरणा व त्यावरील व्याज

  • ९० हजार रुपये : १ लाख ६५ हजार १९० रुपये

  • १ लाख ८० हजार रुपये : ३ लाख ३० हजार ३७३ रुपये

  • ४ लाख ५० हजार रुपये : ८ लाख २५ हजार रुपये

  • ९ लाख रुपये १६ लाख : ५१ हजार ८५५ रुपये

  • १३ लाख ५० हजार रुपये : २४ लाख ७७ हजार ७८२ रुपये

  • १८ लाख रुपये : ३३ लाख ३ हजार ७०६ रुपये

  • २२ लाख ५० हजार रुपये : ४१ लाख २९ हजार ६३५ रुपये

अभियानातील उघडलेल्या खात्याची संख्या

  • एकूण देशभरातील खाती - १० लाख ८९ हजार १५९

  • महाराष्ट्रतील खाती - १ लाख ११ हजार १९

  • पुणे विभाग : १९३८७

  • सोलापूर जिल्हा (सोलापूर व पंढरपूर विभाग) : ३४१९

  • बार्शी टपाल कार्यालय : १५६