Solapur : जिल्ह्यातील १००० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर; ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार शेततळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tractor
Solapur : जिल्ह्यातील १००० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर; ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

Solapur : जिल्ह्यातील १००० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर; ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

सोलापूर : जिल्ह्यातील दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांसह अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २०२३-२४ मध्ये एक हजार ट्रॅक्टर मिळणार आहेत. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना व केंद्राच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत जिल्ह्यासाठी पुढील काही दिवसांत उद्दिष्ट येणार आहे. योजनेअंतर्गत मोठ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी एक लाख तर अल्पभूधारकांना सव्वालाखांचे अनुदान मिळणार आहे.

‘महाडिबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाचवेळी कृषी विभागाकडील सर्व योजनांसाठी एकच अर्ज करतो. त्यातून टप्प्याटप्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळतो. सर्व योजनांचा लाभ मिळेपर्यंत तो अर्ज ग्राह्य धरला जातो. पण, काही वस्तूंचा लाभ घ्यायचे त्या अर्जात राहून गेल्यास संबंधित शेतकरी पुन्हा तो अर्ज ऑनलाइन उघडून पुन्हा त्यात ती वस्तू नमूद करण्याची सोय आहे.

दरम्यान, आता २०२३-२४ या नवीन आर्थिक वर्षातील उद्दिष्ट काही दिवसांत येणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर मिळणार आहेत. दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी एक लाख रुपयांचे अनुदान आहे. एकदा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला पुन्हा त्याची मागणी करता येत नाही. दुसरीकडे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी सव्वा लाख रुपयांचे अनुदान मिळते. उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थीलाच भरावी लागते. दरम्यान, लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात.

ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढून लाभार्थी निवड

शेतकऱ्यांनी ‘महाडिबीटी’वर एकच अर्ज केला आणि त्यात सर्वच योजनांची मागणी केली, तर त्यांना त्याच अर्जावर लाभ मिळतो. शेततळे, ट्रॅक्टर, रोटावेटर, ठिबक सिंचन अशा अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. ऑनलाइन लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. आता राज्य व केंद्र सरकारच्या योजनांमधून ट्रॅक्टरचा लाभ मिळणार आहे.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

६९० शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

बंद झालेली वैयक्तिक शेततळे योजना पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी वैयक्तिक शेततळे योजनेतून ६९० तळ्यांचे टार्गेट आहे. पहिल्या टप्प्यातील लॉटरी काढण्यात आली आहे. आता पुढील टप्प्यात जवळपास पाचशे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. वैयक्तिक शेततळ्याच्या योजनेअंतर्गत ३० फूट रुंद आणि ३० फूट खोल शेततळ्यासाठी शासनाकडून ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यापेक्षा कमी रुंद-खोल शेततळ्यांना त्या पटीत अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.