Solapur: वाहतूक पोलिसांची शहरात १४ ठिकाणी कारवाई सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक पोलिसांची शहरात १४ ठिकाणी कारवाई सुरू

सोलापूर : वाहतूक पोलिसांची शहरात १४ ठिकाणी कारवाई सुरू

सोलापूर : वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर वाहने अडवून हेल्मेटच्या मुद्‌द्‌यावरून वाहनचालकांची विशेष तपासणी मोहीम सुरु केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने मास्क तपासणी व दंड वसुली मोहीम आता थंडावली आहे. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी लगेचच नवीन मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील वाढती अपघाताची संख्या पाहता पोलिसांनी हेल्मेटसक्तीचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. दुचाकीस्वाराकडून वाहन चालवताना हेल्मेट वापरले जात नाही. वाढत्या अपघाताचे हे मुख्य कारण असू शकते असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

शहरात आज सकाळपासून मुख्य रस्त्यावर ही मोहीम अधिक जोरात सुरु करण्यात आली. सातरस्ता, आसरा चौक, देगाव नाका, पार्क चौक, विजापूर नाका आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांची पथके तैनात झाली आहेत. रस्त्यावर बॅरिकेट लावून दुचाकींची तपासणी सुरु झाली आहे. शेकडो दुचाकीस्वारांना हेल्मेट न वापरल्याने दंडाचा भूर्दंड बसला आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

वाहतूक शाखेच्या वतीने अनेक पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या संदर्भात ही मोहीम महत्वाची मानली जाते आहे. कोरोनाच्या काळात मास्क कारवाईला प्राधान्य होते. त्यानंतर फेस्टीवल सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहनचालकांची बेशिस्त अधिकच त्रासदायक ठरु लागली आहे.

वाहने अतिवेगाने चालवणे, निष्काळजीपणाने वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, ट्रीपल सिट जाणे आदी अनेक मुद्‌द्‌यांवर ही कारवाई सुरु झाली आहे. या मोहिमेत केवळ वाहनचालकांवर कारवाई व दंड वसुली न करता केवळ शहराची वाहतूक सुधारावी हा उद्देश वाहतूक पोलिसांनी समोर ठेवला आहे. दुचाकीस्वारांना आवश्‍यक त्या सूचना किंवा समज देण्याचे काम केले जात आहे.

पोलिस आयुक्तांकडून दखल

शहरात पोलिस आयुक्त हरिश बैजल हे रुजू झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या समस्यांच्या संदर्भात माहिती घेतली. तेव्हा त्यामध्ये अगदी सुरवातीलाच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर ही विशेष मोहीम हाती घेतली गेली आहे. वाहतुकीतील बेशिस्त कमी करण्यासाठी त्यांनी या मोहिमेत लक्ष घातले आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

काय आहे पोलिसांची मोहीम

  • वाहतुकीतील बेशिस्त कमी करण्याचा प्रयत्न

  • कारवाई व दंड वसुली एैवजी वाहनचालकांना समज देण्यावर भर

  • वाहतूक विभागातील २५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोहिमेत समावेश

  • शहरातील एकूण १४ ठिकाणे कारवाईसाठी निश्‍चित

  • दररोज किमान आठ ठिकाणी कारवाई मोहीम

कोरोनानंतर आता शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याची गरज होती. वरिष्ठाच्या आदेशानुसार ही मोहीम हाती घेतली आहे. शहरातील वाहतूक सुधारावी यासाठी ही मोहीम नागरिकांच्या मदतीनेच पूर्ण केली जात आहे. वाहतूक विभागाची दैनंदिन कामे सांभाळून ही विशेष मोहीम सुरु आहे.

- दिपाली धाटे, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर

loading image
go to top