सोलापूर : मुक्कामी असणाऱ्या 200 लालपऱ्या बेपत्ता

बसअभावी नागरिकांचे हाल; आर्थिक झळ सोसवेना
ST
STsakal

सोलापूर : नागरिकांची लाईफलाईन असलेली लालपरी ग्रामीण भागात खूप जिव्हाळ्याची आहे. दररोज गावात येऊन सर्व प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी सोडून जायची. कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सर्वांना गावात घेऊन यायची अन्‌ रात्रीचा मुक्काम गावातच असायचा. पण मार्च २०२० पासून कोरोनामुळे लॉकडाउन आणि आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे सोलापूर विभागातील मुक्कामी जाणाऱ्या २०० गाड्या बसस्थानकत उभ्या असून, ग्रामीण भागात या लालपऱ्या फिरकल्याच नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण होत आहे.

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रवासाची सर्व साधने जागेवर ठप्प झाली होती. निर्बंध शिथिल झाल्याने कशीबशी हळूहळू प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र ऐन दिवाळीपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपाचे हत्यार उगारले. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये अद्यापही लालपरीची सेवा बंदच राहिली आहे. परिणामी विद्यार्थी व प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनाने प्रवास करत असल्याने मोठी आर्थिक झळदेखील पोहोचत आहे. काही कर्मचारी कामावर पुन्हा रुजू होत असल्याने काही बस सुरू झाल्या असल्या तरीही त्या मुख्य मार्गावरच धावत आहेत.

त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून गावात मुक्कामी जाणाऱ्या बस मात्र आगारातच थांबून असल्याने त्या भागातील प्रवाशांना लालपरीचे दर्शन झालेले नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिक हे शिक्षण, बाजारपेठ, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी शहराच्या ठिकाणी येतात. मागील अडीच वर्षांपासून नागरिकांना व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होत आहे.

तासन्‌तास प्रतीक्षा

काही गावांमध्ये तासन्‌तास वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असून, पैसेदेखील दुप्पट वसूल केले जात आहेत. बससेवा नसल्याने खासगी वाहनांवर खर्च करणे परवडेनासे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com