यशोगाथा : विहीर फोड्या जाधव बंधूंना शेतीत लाखोचे उत्पन्न

The success stories of Nagesh and Santosh Jadhav in Fulchincholi
The success stories of Nagesh and Santosh Jadhav in Fulchincholi

पंढरपूर (सोलापूर) : वय अवघं 17 वर्षे... या वयात शिक्षण घेणं... खेळणं, बागडणं. मौज मजा करणं.. पण यातील काहीच नशिबात नव्हतं. वडिलांनी व्यसनामध्ये होती तेवढी शेती विकून टाकली. त्यामुळे रोजंदारी करूनच उदरनिर्वाह करणे एवढेच हाती होते. दोघे भावंडे एकमेकांच्या हातात हात घालून विहीर खोदण्याची कामं करू लागले. रोजंदारीने आलेल्या पैशावर आई-वडील व दोघा भावांचा उदनिर्वाह सुरू झाला. बघता... बघात... सलग 17 वर्षे त्यांनी लोकांच्या विहिरी फोडण्याची कामं केली आणि केलेल्या कष्टाचं चीज झालं. एक गुंठाही जमीन नसलेला विहीर फोड्या... आज सात एकराचा बागायतदार झाला. हे सगळं ढोबळी मिरचीच्या उत्पन्नातून शक्‍य झालं. 50- 100 रुपयांसाठी मोलमजुरी करणारं कुटुंब आज करोडपती बनलंय. ही रोमहर्षक कहाणी आणि यशोगाथा आहे, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील नागेश आणि संतोष जाधव या बंधूंची. 
घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने संतोष जाधव यांना शिक्षण घेणे अशक्‍य झाले. त्यामुळे 1995 मध्ये त्यांनी दहावीतून शिक्षण सोडले आणि थेट विहिरी फोडण्याचे काम सुरू केलं. कामातून मिळविलेल्या पैशातून त्यांनी विहीर खोदण्याचे क्रेन घेतले. तेथूनच त्यांच्या प्रगतीला पंख फुटले. जवळपास 17 वर्षे विहिरी खोदण्याची कामं केली. त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी सुरवातीला एक एकर शेती खरेदी केली. कमी पाणी आणि जमिनीत त्यांनी भाजीपाल्याची शेती सुरू केली. त्याच वेळी त्यांना कृषी विभागाच्या शेडनेट योजनेची माहिती मिळाली. त्यातून बॅंक ऑफ महाराष्ट्रचे 14 लाख कर्ज काढून एक एकरावर शेडनेट उभारले. एकीकडे शेती आणि दुसरीकडे विहीर खोदण्याची कामे अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली. 
पहिल्यावर्षी त्यांनी शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली. पहिल्याच वर्षी त्यांना अवघ्या सहा महिन्यांत ढोबळी मिरचीचे 48 टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता त्यांना जवळपास आठ लाखांचा नफा मिळाला. ढोबळी मिरची फायद्याची ठरल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षीही ढोबळी मिरची लागवड केली. कष्ट, जिद्द आणि मेहनती जाधव कुटुंबीयांनी कमी खर्चात अधिक उत्पन्न घेतले. गेल्या पाच वर्षांपासून ते एक एकर शेडनेटमध्ये ढोबळीचे सातत्याने पीक घेतात. गेल्या पाच वर्षांत त्यांना ढोबळी मिरचीने करोडपती बनवले. त्यातूनच जाधव कुटुंबीय आज सात एकराचे बागायतदारही झाले. विहीर फोड्या मजूर ते ढोबळी मिरची बागायतदार अशी त्यांची नवी ओळख परिसरात तयारी झाली आहे. मिरची पिकात यश मिळाल्याने आज त्यांच्याकडे अनेक शेतकरी मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. श्री. जाधवही त्यांना विना मोबदला मार्गदर्शन करतात. 
अशी केली ढोबळी मिरचीची लागवड... 
यावर्षी जाधव यांनी एक एकर शेडनेटमध्ये 22 नोव्हेंबर 2019 ला पाच फूट बेड तयार करून त्यावर सव्वा फूट अंतरावर आयशा वाणाच्या ढोबळी मिरची रोपांची लागवड केली. पाण्यासाठी त्यांनी ठिबकसिंचनाचा वापर केला. लागवड केल्यापासून त्यांना 54 व्या दिवसांपासून उत्पन्न सुरू झाले. लागवडी पूर्वी त्यांनी ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने जमिनीची मशागत केली. त्यात चार ट्रेलर शेणखत टाकले. त्यानंतर फणपाळी करून लागवड केली. आतापर्यंत त्यांना दहा टन मिरची विक्री केली आहे. पुणे येथील मार्केटमध्ये सरासरी 25 हजार रुपये टन दर मिळाला आहे. यावर्षीही त्यांना 40 टन उत्पादन मिळेल, अशी आशा आहे. त्यातून 10 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. दोन लाखांचा खर्च वजा जाता आठ लाख रुपये निव्वळ हाती राहतील याची त्यांना पूर्ण खात्री आहे. याबरोबरच त्यांच्याकडे डाळिंब, टोमॅटो अशी इतर पिके देखील आहेत. जाधव यांनी शेतीत यांत्रिकीकरणाचाही वापर सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com