Solapur News : साहेब रिचार्जड, सरांचा अ‍ॅक्शनमोड" सोलापुरात होणार का जेष्ठांची लढाई ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News

Solapur News : साहेब रिचार्जड, सरांचा अ‍ॅक्शनमोड" सोलापुरात होणार का जेष्ठांची लढाई ?

सोलापूर : लोकसभेच्या पराभवानंतर अलिप्त राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे रिचार्ज होऊन राजकीय पटलावर पुन्हा एकदा सक्रीय झालेत. तर दुसरीकडे माजीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.लक्ष्मण ढोबळे हे ‘अ‍ॅक्शन’मोडवर आहेत. दरम्यान ‘आसमा और भी हैं’ असं सांगत हे दोघे जेष्ठ नेते सोलापूर लोकसभेच्या आखाड्यात एकमेकाच्या विरोधात उभे ठाकतील हे नक्की मानलं जातय. तशी तयारीदेखील त्यांनी ठेवल्याची माहिती आहे.

खासदारकीच्या दोन निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखावी लागलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी मागच्या दोन-अडीच वर्षात विजनवासात राहणं पसंद केलं. झालेला पराभव जिव्हारी लागल्यानं त्यांनी आपल्या सोलापूर लोकसभा मतदार संघात अ‍ॅट्याचमेंट ठेवली ना पक्ष पातळीवर सक्रीय राहणं ठेवलं. सुशीलकुमार यांची भूमिका वेट अँन्ड वॉच अशीच राहिली. सोलापूरला येणंदेखील त्यांचं कमी राहिलं. ज्येष्ठांचे सत्कार किंवा पुस्तक प्रकाशन सोहळे अशा केवळ कार्यक्रमांना हजेरी लावणार्‍या सुशीलकुमारांनी सोलापूरकरांना वार्‍यावर सोडलं का? ते आता राजकीय सेवानिवृत्ती घेतील. कोणतीच निवडणूक लढवणार नाहीत, असा मुद्दाही उपस्थित झाला. तशी चर्चा खुद्द काँग्रेसमधील मंडळींसह अन्य पक्ष आणि सोलापूर लोकसभा मतदार संघामधील नागरिकांमध्ये सुरु होती.

तथापि या सर्व शक्यता आणि चर्चांना सुशीलकुमार यांनीच खुद्द पूर्णविराम दिल्याचे राजकीय विश्‍लेषकांचं आता म्हणणं आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ या अभियानात सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत:ला झोकून देत या पक्षाचे नेते राहूल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले. पंचाहत्तरी ओलांडलेल्या सुशीलकुमारांमधली ऊर्जा यावेळी प्रकर्षानं जाणवली. ‘लंबी रेस का घोडा’ हेच त्यांच्याबाबतीत दिसलं. ‘आसमा औंर भी हैं’हेच त्यांच्याबाबतीत दिसलं. शिवाय काँग्रेस पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्या नेतृत्वानंतर या पक्षाचे नेते राहूल गांधी यांच्याशी त्यांची अ‍ॅट्याचमेंट असल्याचं दिसलं.

दरम्यान त्यांची ही ऊर्जा पाहता ते येत्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभेच्या आखाड्यात उतरतील हे निश्‍चित मानलं जात आहे. कारण विजयाचा गुलाल अंगावर घेऊन म्हणे त्यांना राजकीय सेवानिवृत्ती घ्यायची आहे, पराभवाचा कलंक पुसायचा. पराभवाचं शल्य शेवटपर्यंत वाटायला नका,े असाच सुशीलकुमारांचा व्होरा आहे, त्यातून ते आगामी सोलापूर लोकसभा लढतील हे निश्‍चित आहे. शिवाय वारसदार राजकीय कन्या प्रणिती शिंदे यांच्याकडे त्यांनी अनेक जबाबदार्‍या दिल्या असल्या तरी सुशीलकुमारांनी राजकीय सेवानिवृत्ती घेतल्याचे जाहीर केलेले नाही. त्यामुळे ते खासदारकीला तचे लढतील या शक्यतेला बळकटी मिळते. शिवाय त्यांच्या निकटवर्तीयांकडून हीच माहिती मिळते.

विशेषत्वे, सोलापूर लोकसभा मतदार संघात उतरविण्यासाठी काँग्रेसकडे तेवढा मोठा सक्षम चेहराच नाही. सुशीलकुमारांशिवाय सक्षम उमेदवार कोणीच नाही. आयात उमेदवार चालणार नाही. या सर्वबाबी लक्षात घेता, सुशीलकुमारांची उमेदवारी फिक्स मानली जातेय.

तद्वतच दुसर्‍या बाजूला पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘वजनदार’ दलित चेहरा माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे हे आरक्षीत सोलापूर लोकसभा लढविण्यासाठी सज्ज आहेत. भाजपाकडून कोणत्याही परिस्थितीत खासदारकीचं तिकीट मिळवायंच याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यासाठी मुुंबर्ई, नागपूर आणि दिल्ली अशा वार्‍या ढोबळे यांनी सुरु ठेवल्या आहेत.

‘ढोबळ’मानाने नव्हे; पक्का विश्‍वास

सत्तसाठी सर्वसमावेश राजकारण हा नवा अजेंडा भाजपानं अंगिकारला आहे. समाजातील सर्व घटकांना भाजपाच्या झेंडाखाली आणायचं आणि सत्तेचं सिंहासन कायम करायचं ही भाजपची रणनिती आहे. या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्रातील दलित नेतृत्वाचा तगडा, सक्षम चेहरा अन् अनुभवी चेहरा म्हणून दिल्ली भाजवाले खासदारकीच्या तिकीट वाटपावेळी आपल्याबाबतीत सकारात्मक विचार करतील असा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना विश्‍वास वाटतो. शिवाय महाराष्ट्र भाजपाचे देवेंद्र अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे असूनही दिल्ली भाजपात अढळस्थान असलेले केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी या वजदानदार नेतेमंडळींच्या शिफारशी दिल्ली भाजपवाल्यांला होतील, यातून उमेदवारी मिळेल असा विश्‍वास ढोबळे यांना आहे. म्हणून निवडणुकीसाठी ते आतपासून सज्ज आहेत.

मुंबई व्हाया नागपूर ते दिल्ली सेटींग

सोलापूर लोकसभा लढण्यासाठी सज्ज असलेल्या माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी उमेदवारीसाठी आतपासून सेटींग लावली आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी ते भाजपाचे अध्यक्ष अमित शहा अशी सेटींग ढोबळे यांनी लावली आहे. शहा, गडकरी आणि शहा या नेतेमंडळींकडं सोलापूर लोकसभेसाठी मीच कसा सक्षम आहे, हे वारंवार पटवून दिले आहे. मला उमेदवारी दिल्यास राज्यातील दलित समाज भाजपाच्या झेंड्याखाली कसा येईल? तो कसा आणता? भाजपाची ताकद कशी वाढेल. पूर्वापार काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई आदींच्या झेंड्याखालील या समाजाची दलित व्होट बँक भाजपाकडं कशी येईल? हे ढोबळे भाजपावल्यांना पटवून देत आपली उमेदवारी निश्‍चित करण्यासाठी आतापासून झगडत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला किती यश मिळेल हे काळालाच माहिती.