
GST : मार्च अखेरपर्यंत जीएसटीचे २०० कोटीने वाढले टार्गेट
सोलापूर : जीएसटी विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत संकलन वाढविले. मार्च अखेरीला दोनशे कोटींचे उदिष्ट गाठायचे आहे. वर्षभराचे ७०३ कोटींचे उदिष्ट पूर्ण करायचे आहे, त्यासाठी ‘मिशन ७०३ कोटी’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे.
जीएसटी सोलापूर विभागाच्या अंतर्गत बार्शी विभाग व उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. जीएसटीचे संकलन सातत्याने वाढत चालले आहे. बहुतांश सेवा या जीएसटीच्या कार्यकक्षेत आल्याने संकलनाचा आकडा वाढत चालला आहे.
मागील वर्षी जानेवारी २०२२ पर्यंत चांगली कामगिरी जीएसटी विभागाने नोंदविल्यानंतर यावर्षी मागील वर्षीचे आकडेदेखील ओलांडले आहेत. मागील वर्षी चारशे कोटीचा आकडा स्थानिक जीएसटी विभागाने गाठला तर यावर्षी पाचशे कोटीचा आकडा ओलांडला आहे.यावर्षी करसंकलन अंदाजे शंभर कोटीने वाढणार आहे. वाढीव कर संकलनाची सेंच्युरी ठोकली जाणार आहे.
मात्र तरीहीदेखील जीएसटीच्या वाढत्या कार्यकक्षामुळे पुन्हा एकदा टार्गेटमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी मार्च अखेरच्या धावपळीत टार्गेट वाढले असल्याने यंत्रणा सजग होऊन कामाला लागली आहे.
कर संकलन सुरळीतपणे व्हावे, यासाठी व्यापाऱी व करदात्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. करदाते देखील कार्यालयात भेटून त्यांच्या कर भरण्याच्या बाबतीत असलेल्या अडचणी मांडत आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले करसंकलनाचे आकडे बाजारपेठेचा आर्थिक विकास व वाढत्या उलाढालीचे निर्देशक मानले जातात. त्यानुसार, यावर्षाचे करसंकलन अंदाजे शंभर कोटीने वाढणार असल्याने त्या तुलनेत उलाढाल देखील वाढत चालली आहे. व्यवसाय, उद्योग व सेवा क्षेत्रातील वाढत्या प्रगतीचे ते द्योतक आहे.
ठळक बाबी
- मागील वर्षीच्या तुलनेत वाढले करसंकलन
- कर वाढीसोबत टार्गेटमध्ये देखील मोठी वाढ
-कर संकलनात कोल्हापूर विभागात सोलापूरची चांगली कामगिरी
आकडे बोलतात
- मागीलवर्षी जानेवारी २२ अखेरचे जीएसटी संकलन- ४११.५३ कोटी
- यावर्षीची जानेवारी २३ अखेरचे प्रत्यक्ष जीएसटी संकलन- ५०५.६७ कोटी
- राज्याच्या जीएसटी संकलनाच्या तुलनेत सोलापूरचा हिस्सा- ५.७७ टक्के
- मार्चअखेरीस जीएसटी संकलनाचे उदिष्ट्य ७०३ कोटी रुपये
- कोल्हापूर झोनचे जीएसटी संकलन उदिष्ट्य- ३ हजार १३७ कोटी