वस्त्रोद्योग पंढरी सोलापुरात टेक्स्टाईल पार्क कधी होणार?

इचलकरंजीला कार्यालय हलविल्याने अडचणी; सक्षम नेतृत्वाअभावी पुन्हा अन्याय
textile park Pandhari Solapur park
textile park Pandhari Solapur parksakal

वस्त्रोद्योगाची पंढरी म्हणून जगभर परिचित असलेल्या सोलापुरातील टेक्स्टाईल कमिटी ऑफ इंडियाचे कार्यालय इचलकरंजीला हलविण्यात आल्याने सोलापूरवर होणाऱ्या अन्यायाच्या शृंखलेत आणखी एकाने भर पडली आहे. सोलापुरात तब्बल सहाशे टॉवेल उत्पादक, पाचशेपेक्षा अधिक गारमेंट फॅक्टऱ्या व ग्रामोद्योगाचे ४० युनिट असताना हा प्रकार घडत आहे. पुन्हा एकदा सोलापूरच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उभे राहात आहे. यावर मात करण्यासाठी सोलापुरात आता टेक्स्टाईल पार्क होण्याची नितांत गरज आहे.

जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरात केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे टेक्स्टाईल कमिटी ऑफ इंडियाचे कार्यालय खूप वर्षांपासून होते. १९६६ पासून या कार्यालयात एक उच्चस्तरीय अधिकारी, पाच ते सहा सहाय्यक कार्यरत होते. सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योग प्रचंड जोरात होता, त्यावेळची ही परिस्थिती होती. परंतु जगभरातील उलथापालथ, जागतिकीकरण तसेच स्पर्धेच्या वातावरणातून सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला उतरती कळा लागली. तेव्हा टेक्स्टाईल कमिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयातील अधिकारी व सहाय्यकांच्या संख्येत हळूहळू घट होत गेली. अखेर गतवर्षी एक अधिकारी व एक सहाय्यक इतकाच काय तो स्टाफ या ठिकाणी राहिला. ऑगस्ट २०२१ मध्ये तर हे कार्यालय येथील कामाचा पुरेसा ताण नसल्याचे कारण पुढे करत इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे हलविण्यात आले. सोलापूरप्रमाणेच कोचीन, भुवनेश्‍वर व पानिपत येथील कार्यालये बंद करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. सोलापूर वगळता अन्य ठिकाणच्या उद्योजकांनी कार्यालय हलविण्यास विरोध केला. त्यावेळेस सोलापूरकर व सोलापूरचे नेतृत्व मात्र शांत होते.

केवळ कामाच्या ताणाचे कारण देत हे कार्यालय हलविल्याने ते पुन्हा सुरू होण्यासाठी येथील काम वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी सोलापुरात टेक्स्टाईल पार्क उभारणे गरजेचे आहे. टेक्स्टाईल पार्कसाठी मध्यंतरीच्या काळात सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कुंभारी, मंद्रूप अन्‌ नरसिंग गिरजी मिलमधील जागा यासाठी आरक्षित करण्याच्या चर्चेने जोर धरला होता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी व मंद्रूप या दोन गावांमधून ठिकाण निवडण्यावरून राजकारणही पेटले होते. सेना-भाजप युतीच्या काळात पालकमंत्री असलेल्या विजयकुमार देशमुख यांच्याकडे काही काळ वस्त्रोद्योग खाते होते.

त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तर या खात्याचे कॅबिनेट दर्जाचे पद होते. त्यांनी येथील यंत्रमाग व गारमेंटला ‘अच्छे दिन’ येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. सोलापूरच्या उद्योजकांसाठी सकारात्मक प्रतिसाद देत येथील गारमेंटच्या निर्यातीसाठी चांगले वातावरण निर्माण करण्यात यश आले. दरम्यान, कोरोनामुळे सोलापूरच्या गारमेंट उद्योगापुढे मोठी अडचण आली. गेल्या दोन वर्षांत या उद्योगाने मानच टाकली होती. आता येथील उद्योजक कात टाकून पुन्हा नव्याने उभे राहण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. त्यांना यात काही प्रमाणात यशही येऊ लागल्याचे चांगले चित्र दिसू लागले आहे.

तोडगा निघण्याची गरज

सोलापूर हे चादर, टॉवेल व गारमेंट त्याचबरोबर ग्रामोद्योगाचे हब असल्याने टेक्स्टाईल कमिटी ऑफ इंडियाचे कार्यालय हलविण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मत येथील उद्योजकांनी व्यक्त केले. या कार्यालयामार्फत नोंदणी, निर्यातीसंदर्भातील पूर्तता, तांत्रिक बाबींची व प्रत्यक्ष तपासणी, सर्टिफिकेशन, निर्यातीचे करार करण्यासाठी मोठी मदत होत असे. आता कार्यालय इचलकरंजीला हलविल्याने सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. टेक्स्टाईल, गारमेंट, हातमाग, ग्रामोद्योग संदर्भातील निर्याती, तांत्रिक व अन्य कामकाजासाठी तातडीचे निर्णय घेण्याकरिता सोलापुरात कार्यालय असणे गरजेचे आहे. सध्या सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने झालेले असले तरी प्रत्यक्ष तपासणी, नोंदणी, सर्टिफिकेट, उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष अधिकारी भेटणे गरजेचे आहे. टेक्स्टाईलच्या प्रत्येक कामासाठी इचलकरंजी गाठावी लागते. एका दिवसात काम झाले नाही तर तेथे मुक्काम करावा लागतो. यावर तोडगा निघणे गरजेचे आहे.

ठळक नोंद...

  • यंत्रमाग कारखाने - ६००

  • रोजची उलाढाल : पाच ते सहा कोटी

  • वार्षिक उलाढाल : १५०० ते १६०० कोटी

  • गारमेंट फॅक्टऱ्या : ३५० हून अधिक

  • ग्रामोद्योग : सुमारे ४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com