esakal | कोरोना रुग्णांच्या बिलांची होणार दररोज तपासणी ! सहा लेखापरीक्षण पथकांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Bill

कोरोना रुग्णांच्या बिलांची होणार दररोज तपासणी ! सहा लेखापरीक्षण पथकांची नियुक्ती

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यात कोरोना (Covid-19) बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी तालुक्‍यात शहर व ग्रामीणमध्ये 14 खासगी रुग्णालयांना प्रशासनाने कोव्हिड हॉस्पिटल (Covid Hospitals) चालविण्यास परवानगी दिली आहे. या हॉस्पिटल्समधून मिळणाऱ्या बिलाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासन नियमाच्या अधीन राहून रुग्णालयांमध्ये आकारण्यात येणाऱ्या बिलांची पथकामार्फत दररोज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी दिली. (The bills of Corona patients in Pandharpur will be checked daily)

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तालुक्‍यात 14 खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे शासन निर्णयानुसार लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांमधील बिलांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून लेखा परीक्षणासाठी सहा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांमार्फत खासगी रुग्णालयांच्या रॅंडम बेसीसवर तसेच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

हेही वाचा: "ओन्ली बेड अँड हॉस्पिटल !' व्हॉट्‌सऍप ग्रुपने वाचवले अनेक कोरोना रुग्णांचे प्राण

पंढरपूर शहरामधील गॅलॅक्‍सी, लाईफलाइन, श्री गणपती, जनकल्याण, ऍपेक्‍स, श्री विठ्ठल, पावले, वरदविनायक, मेडिसिटी, ऑक्‍सिजन पोलिस, पडळकर, विठ्ठल, डीव्हीपी तसेच करकंब येथील जगताप हॉस्पिटल या 14 खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या संबंधित हॉस्पिटलबाबत ज्या कोणाला बिलांबाबत साशंकता असेल तर त्यांनी बिल अदा करण्यापूर्वी प्रांत कार्यालय, पंढरपूर येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच बिलांबाबत लिखित स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात. अधिक माहितीसाठी नियंत्रण कक्षातील 8446525250 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.

loading image