
Sharad Pawar: थोरल्या पवारांच्या रडारवर सुशीलकुमार शिंदे? लोकसभेला सोलापूरमध्ये भाकरी फिरवणार
काळाचा महिमा अगाध असतो. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ज्यांना घेऊन सोलापूर महापालिका ते सोलापूर लोकसभापर्यंतचे राजकारण केले त्या कै. विष्णूपंत (तात्या) कोठे यांच्या चिरंजीवांना म्हणजे महेश कोठे यांना घेऊन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार २०२४ च्या सोलापूर लोकसभेची चाचपणी करत आहेत.
सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपर्यंत शरद पवार म्हणजे सुशीलकुमार शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे म्हणजेच शरद पवार असेच काहीसे समीकरण होते.
या समीकरणात आता बदल झालाय, असे संकेत अधून-मधून मिळत होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात थेट मोठ्या पवारांनी लक्ष घातल्याने गल्लीतील दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद दिल्लीतील मोठ्या नेत्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. पवारांच्या रडारवर शिंदे आले आहेत का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
- प्रमोद बोडके
सोलापूर लोकसभा मतदार संघ काँग्रेस लढवते. काँग्रेसला जेवढी सोलापूरची काळजी नाही, तेवढी काळजी राष्ट्रवादी करताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेलेला माढा लोकसभा मतदार संघ पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी जेवढी चाचपणी सध्या करताना दिसत नाही. पण लढवत नसलेली सोलापूरची जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करताना दिसत आहे.
आगामी लोकसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आजही कधी जाहीर कार्यक्रमात तर कधी खासगीत सांगतात. तूर्तास मुंबई सोडून दिल्लीला जाण्यास आमदार प्रणिती शिंदे या देखील फारशा उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळेच शिंदे नसतील तर आम्ही या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर लोकसभा मतदार संघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
सोलापुरातील राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांची भावना कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी सुरवातीला त्यांच्या पातळीवर जाहीरपणे मांडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडली. शरद पवार यांनीही ‘भाकरी फिरविण्याची’ ही मागणी गांभीर्याने घेत चाचपणी सुरू केली आहे.
आमदार रोहित पवारांच्या मागणीवरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यंतरी चांगलीच जुंपली होती. हा वाद शांत होईपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधी सोलापुरात तर कधी मुंबईत सोलापूरची चाचपणी सुरू केल्याने या मागणीकडे आता गांभीर्याने पाहण्यात येऊ लागले आहे.
लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभेच्या जागेवर कोण लढणार? याचा फैसला होण्यापूर्वी सोलापूर महापालिकेचे मैदान अगोदर दोन्ही काँग्रेसला मारावे लागणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आयत्यावेळी तुटलेली आघाडी या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेचे कोडे सोडविणे आवश्यक असणार आहे.
भाजप शांत, अस्वस्थ दोन्ही काँग्रेस
सलग दोनवेळा सोलापूर लोकसभा जिंकल्यानंतर भाजप सध्या येथील विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी शांतपणे तयारी करत आहे. दोनदा हरलेल्या जागेसाठी आणि लढवत नसलेल्या या जागेसाठी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये शाब्दिक लढाई सुरु झाली आहे.
कोण रोहित पवार? या प्रश्नानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भुट्टा शब्द वापरून विदर्भाच्या भाषेत सोलापुरात येऊन झटका दिला आहे. भुट्टा म्हणून राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी किरकोळ, अदखल पात्र ठरवलं आहे. राष्ट्रवादीकडून याला कसे प्रत्युत्तर मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांचीही चर्चा अन् शक्यता
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढविली होती. वंचित व एमआयएम यांच्या आघाडीमुळे त्यांना सोलापुरातून १ लाख ७० हजार मते मिळाली होती. सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव १ लाख ५८ हजार मतांनी झाला. ॲड. आंबेडकर हे महाविकास आघाडीत आले आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जर सुशीलकुमार शिंदे किंवा आमदार प्रणिती शिंदे उमेदवार नसतील तर ही जागा महाविकास आघाडीमधून वंचित बहुजन आघाडीला सोडून ॲड. आंबेडकर उमेदवार असू शकतात? अशी शक्यता आणि चर्चाही आता सुरू होऊ लागली आहे. गेल्या वेळी वंचितला मिळालेल्या १ लाख ७० हजार मतांचा गॅप कसा भरून काढायचा? असा प्रश्न भाजपला सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत पडू शकतो.