१२ वर्षीय मुलीला बापानेच विकले ८ कला केंद्रांना! मुलीने फेसबूकवर शोधले आईला, व्हिडिओ कॉल केला अन्‌...

बाप म्हणजे जगातील पहिलावहिला देव, अनमोल अशी ठेव, बाप म्हणजे आईच्या मंगळसूत्रातील मणी, डोळ्यातील पाणी, बाप म्हणजे घराचे मजबूत दार. पण, करमाळा तालुक्यातील एका बापाने स्वत:च्याच १२ वर्षीय मुलीला कला केंद्रांना विकून सहा लाख रुपये घेतले.
fathers
fatherssakal

सोलापूर : बाप म्हणजे जगातील पहिलावहिला देव, अनमोल अशी ठेव, बाप म्हणजे आईच्या मंगळसूत्रातील मणी, डोळ्यातील पाणी, बाप म्हणजे घराचे मजबूत दार. पण, करमाळा तालुक्यातील एका बापाने स्वत:च्याच १२ वर्षीय मुलीला एकदा नव्हे तर चारवेळा पुण्यातील कला केंद्रांना विकून सहा लाख रुपये घेतले. पुन्हा त्याने सोलापुरातील चार कला केंद्रांना तिला अडीच लाख रुपयाला विकले. या प्रकरणी मुलीच्या आईने जोडभावी पेठ पोलिसांत धाव घेतली आणि त्या नराधम बापाचे पितळ उघडे पडले.

कोरोना काळात दोन वर्षांपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते, घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. अशावेळी हातावरील पोट असलेल्यांना किमान दोनवेळचे जेवण देखील मिळत नव्हते, अशी स्थिती होती. अनेकांच्या डोक्यावरील कर्जाचा भार वाढत होता, त्या चिंतेतून काहींनी जगाचा निरोप देखील घेतला. तर काहींनी ‘हे पण दिवस जातील’ अशी आशा उराशी बाळगून कोरोनाचे संकटाचा सामना केला.

पण, करमाळा तालुक्यातील एका नराधम बापाने मुलीचे वय शिक्षणाचे, खेळण्या-बागडण्याचे असतानाही तिला चक्क पुण्यातील वेगवेगळ्या कला केंद्रांना विकले. लॉकडाउनमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी पैशांची अडचण असल्याने तिला कला केंद्रात पाठविल्याचे त्या बापाने पोलिसांना सांगितले. मात्र, वस्तुस्थिती खूपच वेगळी असल्याचे आता समोर आले आहे.

पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेतल्यानंतर जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या बापाला बेड्या ठोकल्या. त्याच्यासोबत मध्यस्थी महिलेला देखील जेरबंद केले. न्यायालयाने त्यांना आता २६ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. पीडित अल्पवयीन मुलीला पोलिसांनी कला केंद्राच्या तावडीतून सोडवले. सध्या वैद्यकीय अहवालासाठी ती श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) दाखल आहे.

पोटच्या गोळ्याला विकण्याची विकृत मानसिकता

वंशाला दिवा असावा म्हणून देव-देऋषीकडे जाऊन नवस करणारे, हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयांचा खर्च करणारे हजारो लोक समाजात पाहायला मिळतात. पण, दुसरीकडे पोटच्या गोळ्याला विकणारी विकृत मानसिकता देखील समाजात आहे. करमाळा तालुक्यातील एका नराधमाने प्रेमविवाह केला.

पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरु होता, त्यांना गोंडस मुलगी झाली. तिचे पालन-पोषण करीत आईने मोठे स्वप्न पाहिले. पण, जसजसे मुलीचे वय वाढत होते, तसतसे नराधम बापाच्या डोक्यात वेगळेच विचार सुरु होते. मुलगी १२ वर्षांची झाली आणि मध्यस्थी महिलेच्या माध्यमातून त्या मुलीला दीड-दोन लाख रुपयाला पुण्यातील वेगवेगळ्या कला केंद्रांना खुद्द बापानेच विकले. पैसे फिटेपर्यंत चिमुकली त्या कला केंद्रांतच असायची. त्या दरम्यान, अनेकांनी तिच्या शरीराचे लचके तोडल्याची बाब पोलिस तपासात समोर आले आहे.

‘ती’ने फेसबूकवर आईला शोधले

बापानेच विकल्याने अन्याय सहन करणाऱ्या ‘ती’ला कला केंद्राचे पैसे फिटेपर्यंत ड्रेस देखील घालू दिला जात नव्हता. तेथील त्रासाला कंटाळून मुलीने फेसबूकवरून आईला शोधले. आईच आहे का हे पडताळण्यासाठी तिने व्हिडिओ कॉल करून कन्फर्म केले. त्यावेळी ‘प्रत्यक्ष भेट आणि माझी इथून सुटका कर’ म्हणून तिने आईला विनवणी केली. त्यानंतर आईने जोडभावी पेठ पोलिस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वसंत पवार, विजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक संजिवनी व्हट्टे यांच्या पथकाने सोलापूरजवळील एका कला केंद्रातून तिची सुटका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com