कांद्याला प्रतिकिलो १ ते ६ रुपयांचा भाव! सोलापूर बाजार समितीत ४१० गाड्यांची आवक; ‘नाफेड’ कडून खरेदी नाहीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion
कांद्याला प्रतिकिलो १ ते ६ रुपयांचा भाव! सोलापूर बाजार समितीत ४१० गाड्यांची आवक; ‘नाफेड’ कडून खरेदी नाहीच

कांद्याला प्रतिकिलो १ ते ६ रुपयांचा भाव! सोलापूर बाजार समितीत ४१० गाड्यांची आवक; ‘नाफेड’ कडून खरेदी नाहीच

सोलापूर : राज्यभरात कांद्याचे दर गडगडल्यानंतर ‘नाफेड’च्या माध्यमातून रास्त भावात कांदा खरेदीची ग्वाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने दिली. मात्र, सोलापूर जिल्ह्यात तशी खरेदी अजूनपर्यंत सुरु झालेली नाही. सोलापूर बाजार समितीत शुक्रवारी (ता. ३) ४१० गाड्या कांद्याची आवक होती. त्यात शेतकऱ्यांना एक ते सहा रुपये किलोपर्यंतच दर मिळत असल्याची विदारक स्थिती आहे.

कांदा लागवडीपूर्वीची मशागत, बियाणे व कांदा लागवड, खते आणि कांदा काढणी, चिरून बाजार समिती नेईपर्यंत शेतकऱ्यांचा प्रतिक्विंटल किमान ७०० रुपयांपर्यंत खर्च होतो. मात्र, सध्या बाजार समितीत शेतकऱ्यांना १०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकावा लागत आहे. काही शेतकऱ्यांना कांदा शेतात सोडून द्यावा लागला आहे.

तर चांगला दर मिळत नसल्याने कांदा बाजार समितीतून परत नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ‘नाफेड’च्या माध्यमातून अडीच ते तीन लाख मे.टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केले. मात्र, सोलापूर जिल्ह्यात कुठेच ‘नाफेड’तर्फे खरेदी सुरु झालेली नाही, हे विशेष. त्यामुळे नाईलास्तव शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात कांदा विकावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सोलापूर ‘एपीएमसी’तील शुक्रवारची स्थिती

  • गाड्यांची आवक

  • ४१०

  • कांदा क्विंटलमध्ये

  • ४१,२२४

  • कांदा घेऊन आलेले शेतकरी

  • १,४२०

  • कांद्याचे प्रतिक्विंटल दर

  • १०० ते ६०० रुपये

सात पिशव्याला १६०० रुपयांचा दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूरसह पुणे, उस्मानाबाद, लातूर, कर्नाटक यासह अनेक ठिकाणाहून शुक्रवारी (ता. ३) एक हजार ४२० शेतकऱ्यांनी ४१० गाड्या कांदा विक्रीसाठी आणला होता. ४१ हजार २२४ क्विंटल कांद्यातील जवळपास २८ हजार क्विंटल कांदा प्रतिकिलो तीन ते चार रुपयांनी विकला गेला. दुसरीकडे अवघ्या सात पिशव्याला एक हजार ६०० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.