esakal | "कुरनूर'मधून सोडले पाण्याचे दुसरे आवर्तन ! तीन नगरपरिषदा, 18 ग्रामपंचायतींना लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

Kurnoor Dam

"कुरनूर'मधून सोडले पाण्याचे दुसरे आवर्तन ! तीन नगरपरिषदा, 18 ग्रामपंचायतींना लाभ

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील धरणामधून आज (मंगळवारी) सकाळी नियोजित पाण्याचे दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले. हे आवर्तन चार दरवाजांतून 800 क्‍युसेक प्रतिसेकंद इतक्‍या वेगाने सोडण्यात येत आहे. आताच्या घडीला धरणात 53 टक्के पाणीसाठा आहे आणि हे आवर्तन या बोरी नदीवरील शेवटच्या बबलाद बंधारा भरेपर्यंत सुरू ठेवले जाणार असून, सर्व बंधारे भरतील तेव्हा आवर्तन बंद करण्यात येणार आहे.

आवर्तन सोडल्यानंतर धरणात अंदाजे 30 टक्के पाणी शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे. धरणात आज अखेर 53 टक्के म्हणजे 410 दशलक्ष घनफूट पाणी असून आता सर्व बंधारे भरण्यासाठी साधारण 170 ते 180 दशलक्ष घनफूट इतके म्हणजे 21 ते 23 टक्के पाणी लागणार आहे. या सोडलेल्या पाण्याने तालुक्‍याच्या पूर्व भागातील 40 हून अधिक बोरी नदीकाठच्या छोट्या- मोठ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याची आणि नदीकाठच्या शेतीच्या पाण्याची सोय होण्यास मदत होणार आहे. यामुळे या खालचे सांगवी, बणजगोळ, मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुद्देवाडी व बबलाद हे सर्व बंधारे या पाण्याने भरले जातील व अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी नगरपरिषद आणि नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांची पाण्याची टंचाई आणखी थोडी कमी होणार आहे.

हेही वाचा: पाणी बॉटलच्या दरात दुधाची विक्री ! कोरोनाचा फटका, पशुखाद्याची दरवाढ

दरम्यान, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने अक्कलकोट तालुक्‍यातील जवळपास सर्वच गावांत पाणीटंचाई उद्‌भवली नाही. या वेळच्या तीव्र उन्हाळी स्थितीत सुद्धा ऊस पिके चांगली आहेत; अन्यथा दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पाणी कमी पडून ऊस पिके वाळायला लागायची. या वेळी मात्र अशी स्थिती नाही. तरीही आता नियोजनाप्रमाणे पाणी सोडल्याने शेतकरी व ग्रामस्थांचा उर्वरित उन्हाळा आणखी सुसह्य होऊन बिनत्रासाचा जाणार आहे.

या वेळी उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा, नागनाथ उदंडे, राहुल काळे आदी उपस्थित होते. या सोडलेल्या पाण्याने बोरी नदी काठावरील ऊस व फळबागा यांच्यासाठी पाण्याची आणखी जास्त सोय होण्यास मदत होणार आहे. या पाण्याने सर्व बंधारे अडीच मीटर इतके भरून घेण्यात येणार असून उद्या (शुक्रवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

loading image