
काँग्रेसचे तेच १६ ब्लॉक अध्यक्ष फायनल! जुन्यांना जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीसपदी संधी; नाराजी वाढली
सोलापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटलांनी नेमलेल्या १६ ब्लॉक अध्यक्षांची यादी अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अंतिम केली आहे. जुने ब्लॉक अध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश शिवपुजे, संजय पाटील यांना जिल्ह्याचे उपाध्यक्ष तर सौदागर जाधव, सुनील भोरे यांना सरचिटणीस करण्यात आले आहे.
आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर काँग्रेसचे विशेष लक्ष असणार आहे. पण, जिल्ह्याच्या काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागल्याची वस्तुस्थिती आहे. २५ जानेवारी २०२२ मध्ये नेमलेल्या ब्लॉक अध्यक्षांना २७ डिसेंबर २०२२ पर्यंतच ठेवले आणि त्याठिकाणी इतरांची नेमणूक झाली. पूर्वीच्या ब्लॉक अध्यक्षांना पदावरून काढल्याचाही काही आदेश नाही आणि नव्यांना निवडीचे पत्रही नाही, अशी स्थिती होती. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटलांनी मनमानी पद्धतीने या निवडी केल्याचा आरोप काहींनी केला होता.
या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नाराजांची पंढरपुरात बैठक घेतली. त्यावेळी मराठवाड्याचे एक निरीक्षक नेमले आणि त्यांनी ब्लॉक अध्यक्ष निवडीचा अहवाल तयार करून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. पण, पूर्वीच्याच ब्लॉक अध्यक्षांना आणखी काही महिने तशीच संधी दिली जाईल, असा दावा जिल्ह्यातील काही काँग्रेस नेत्यांनी केला होता. मात्र, अखेर नवीन ब्लॉक अध्यक्षांच्याच निवडी फायनल करण्यात आल्या आणि पूर्वीच्या ब्लॉक अध्यक्षांमधील नाराजांना जिल्हा व प्रदेशवर संधी देण्याचे ठरले आहे. तरीपण, नाराजीनाट्य संपले नसून त्यावर काँग्रेसचे नेते, जिल्हाध्यक्ष कसा तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवनियुक्त ब्लॉक (तालुका) अध्यक्ष
अक्कलकोट : शंकर म्हेत्रे
दक्षिण सोलापूर : हरीश पाटील
उत्तर सोलापूर : शालिवाहन माने-देशमुख
मंगळवेढा : प्रशांत साळे
मोहोळ : सुलेमान तांबोळी
बार्शी ग्रामीण : सतीश पाचकवडे
बार्शी शहर : विजय साळुंखे
माढा : ऋषिकेश बोबडे
पंढरपूर ग्रामीण : हनुमंत मोरे
पंढरपूर शहर : अमर सूर्यवंशी
सांगोला : अभिषेक कांबळे
माळशिरस : सतीश पालकर
करमाळा : प्रतापराव जगताप
वैराग : राहुल खरात
अक्कलकोट शहर : रईस टिनवाला
कुर्डुवाडी : फिरोज खान
मागणी एक अन् जबाबदारी दुसरीच
जुने ब्लॉक अध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश शिवपुजे, संजय पाटील, सौदागर जाधव, सुनील भोरे, अमरजित पाटील यांनी ब्लॉक अध्यक्ष निवडीला हरकत घेतली होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बैठक घेतली आणि बाहेरील निरीक्षकांमार्फत अहवाल तयार करून अंतिम निर्णय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे घेतील, असे स्पष्ट केले होते. पण, आहे तेथेच काम करण्याची इच्छा असलेल्या काहींना जिल्ह्याचे उपाध्यक्ष तर काहींना सरचिटणीस केले आहे. त्यावर काहींनी नाराजी व्यक्त करीत आगामी काळात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातूनच नवीन ब्लॉक अध्यक्षांना मान्यता मिळाल्याचे जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.